Monday, January 19, 2009

मुंबईवरील हल्ल्यामागील सत्य पाकने जगापुढे मांडावे

मनमोहन सिंग ः तैयबावर विनाविलंब कारवाई आवश्‍यक

पाकिस्तानने मुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पारदर्शक तपास करून सत्य जगासमोर तातडीने मांडावे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज येथे केले. पाकिस्तानने सुरू केलेल्या तपासाचा निष्कर्ष काही दिवसांतच जनतेसमोर मांडण्याचे पाकिस्तान सरकारने जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुंबईवर आणि काबूल येथे भारतीय दूतावासावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यासारखे प्रकार पुन्हा घडू नयेत याची खात्री द्यावी. पाकिस्तानने स्वतःच्या हितासाठी पाकिस्तानात सुरू असलेले अतिरेक्‍यांचे प्रशिक्षण तळ तातडीने बंद करून लष्कर ए तैय्यबासारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध विनाविलंब कारवाई करावी, अशी अपेक्षाही सिंग यांनी व्यक्त केली.

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मनमोहन सिंग हॉटेल ट्रायडण्ट- ओबेरॉय येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात बोलत होते. मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला अतिशय वेदनादायक आणि भयंकर होता. पाकिस्तानला या हल्ल्यासंबंधी आवश्‍यक ते सगळे पुरावे दिल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब पाकिस्तानी असल्याचे याआधीच पाकिस्तानने कबूल केले आहे. आता त्यांनी हे अघोरी कृत्य करणारे, त्याचा कट रचणारे आणि त्याला मदत करणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी. या प्रश्‍नावर आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत घेत असताना पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादी प्रशिक्षण तळ पूर्णतः बंद झाले आहेत का याचीही खातरजमा करावी. पाकिस्तान दिलेल्या शब्दाला जागणार असेल, तर अतिरेकी संघटनांवर कारवाई करावी असे पंतप्रधान या वेळी म्हणाले.

दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी भारत प्रयत्नशील असून त्यासाठी गुप्तचर खाते तसेच सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात येत आहेत. सागरी सुरक्षेसंबंधी अधिक काळजी घेण्यात येत आहे. दहशतवादी कृत्यांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए) सारख्या यंत्रणा तयार करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

सत्यम कॉम्प्युटर्समध्ये झालेला गैरव्यवहार भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रावरील मोठा डाग असल्याचे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. बड्या कंपन्यांनी त्यांचे व्यवहार अधिक सक्षमपणे चालतील याकडे लक्ष द्यावे. जागतिक मंदीबरोबरच भारत सध्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. आगामी दोन वर्षांत या परिस्थितीत बदल होण्याची शक्‍यता नाही. केंद्र सरकारच्या वतीने यावर मात करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचेही सिंग या वेळी म्हणाले.

----------

पंतप्रधानांना ट्रॅफिक जॅमची झळ..!

मुंबईच्या रस्त्यावर होणाऱ्या ट्रॅफिक जॅमचा फटका सामान्य नागरिकांसह व्हीआयपींना न बसला तरच नवल; मात्र देशाच्या पंतप्रधानांना याचा फटका बसला तर? हो. हा प्रकार घडलाय आपल्या मुंबापुरी हाजीअली येथे.
हॉटेल ट्रायडण्ट-ओबेरॉय येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आलेले पंतप्रधान मनमोहन सिंग आज मुंबईच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेच.
अतिरेकी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आलेले पंतप्रधान मनमोहन सिंग सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विशेष विमानाने मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विशेष म्हणजे शहरातील रस्तेवाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी ते आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर खास हेलिकॉप्टरमध्ये बसून कुलाबा येथे असलेल्या नौदलाच्या आयएनएस कुंजली या तळावर उतरण्याचे तसेच तेथून विशेष गाड्यांच्या ताफ्यातून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचण्याचे त्यांचे नियोजन होते.
कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा विमानतळाकडे जाताना मात्र पंतप्रधान रस्ते मार्गानेच आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह निघाले. सायंकाळी 5.50 वाजता गाड्यांचा हा ताफा हाजीअली येथे येताच त्यांचा वेग पूर्णतः मंदावला. हा वेग या परिसरात असलेल्या ट्रॅफिक जॅममुळे मंदावल्याचे पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. पंतप्रधान, राष्ट्रपतींसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती जात असताना त्या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्याचा शिरस्ता आहे; मात्र हा शिरस्ता आज पंतप्रधानांना ट्रॅफिक जॅमचा अनुभव आल्याने मोडला गेल्याचे बोलले जाते.

(sakal, 17 jan)

No comments: