गस्तही वाढविणार ः साधनसामग्रीच्या खरेदीस मंजुरी
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य सुरक्षा दलाकरिता अद्ययावत शस्त्रे, संदेशवहन यंत्रणा व साधनसामग्री खरेदी करण्यासाठी 16 कोटी सात लाख रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. याशिवाय सागरी गस्तीकरिता तातडीची उपाययोजना म्हणून 18 ट्रॉलर्स घेण्यात येणार आहेत. अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या पथकाला आवश्यक साधनसामग्रीच्या खरेदीकरिता लागणाऱ्या निधीला राज्य सरकारने आज मंजुरी दिली.
मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर राज्य पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यास सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी)च्या धर्तीवर राज्य सुरक्षा दलाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार साधनसामग्रीच्या खरेदीकरिता लागणाऱ्या निधीला राज्य सरकारने आज मंजुरी दिली. या निधीतून 500 मॅगझिन्स, 250 ग्लॉक पिस्तूल, 125 साईटस्, 125 वॉकीटॉकी, 250 व्हाइस ड्युसर व 10 ऑपरेशन वाहने घेण्यात येणार आहेत.
राज्य गुप्त वार्ता विभागात सायबर मॉनिटरिंग सेल व सायबर कनेक्टिव्हिटी सेल लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या सेलकरिता आवश्यक साधनसामग्रीच्या खरेदीसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सायबर कनेक्टिव्हिटी व मॉनिटरिंगसाठी प्रत्येकी दीड कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली. बॉम्बशोधक व विनाशक पथकांची उपयुक्तता लक्षात घेता, राज्यात 20 ठिकाणी नव्याने बॉम्बशोधक व विनाशक पथके स्थापन केली जाणार आहेत. या पथकासाठी 16 कोटी सात लाख रुपये खर्च करण्यात येतील. या पथकासाठी डीप सर्च मेटल डिटेक्टर, एक्स्प्लोझिव्ह डिटेक्टर, पोर्टेबल एक्स-रे, इन्डोस्कोप, बीडीडीएस व्हॅन आणि डॉग व्हॅन खरेदी करण्यात येणार आहेत.
गस्तीसाठी 18 ट्रॉलर्स
विस्तीर्ण सागरी किनारपट्टी लाभलेल्या महाराष्ट्राची सागरी गस्त अधिक सक्षम करण्यासाठी येत्या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 18 ट्रॉलर्स खरेदी करण्यात येणार आहेत. या ट्रॉलर्ससाठी 99 लाख 66 हजार रुपयांचा खर्च सरकारने आज मंजूर केला.
(sakal,13 jan)
No comments:
Post a Comment