Tuesday, January 20, 2009

करकरे, ओंबळे यांना "अशोकचक्र'

केंद्राचा निर्णय ः मेजर उन्नीकृष्णन, गजेंद्र सिंग यांचाही समावेश

26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी जिवाची पर्वा न करता दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांना "अशोकचक्र' हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देण्याच्या निर्णयावर केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अतिरेक्‍यांशी मुकाबला करताना धारातीर्थी पडलेले राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि हवालदार गजेंद्र सिंग यांच्याही शौर्याला "अशोकचक्र' देऊन गौरविण्यात येणार असल्याचे गृहखात्यातील सूत्रांनी सांगितले.
लष्कर ए तय्यबाच्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिस दलातील सोळा अधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय सुरक्षा दलाचे दोन जवान अशा अठरा जणांना अशोकचक्र हा सन्मान मिळण्यासाठी त्यांची नावे केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली होती. महाराष्ट्रातून आलेल्या या अठरा नावांपैकी दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे, डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे, राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) चे जवान मेजर संदीप उन्नीकृष्णन व हवालदार गजेंद्र सिंग या चार जणांना अशोकचक्र देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे.
या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी अतिरेक्‍यांच्या मागावर असलेल्या सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, पोलिस निरीक्षक विजय साळसकर हे तिघे अधिकारी व तीन पोलिस कर्मचारी असे सहा जण रंग भवनजवळ अतिरेक्‍यांच्या गोळीबारात धारातीर्थी पडले. गिरगाव चौपाटीजवळ स्कोडा गाडीतून आलेले अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब आणि इस्माईल खान या दोघांशी निःशस्त्रपणे मुकाबला करीत असताना सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे शहीद झाले. पोटात गोळ्या झाडल्या जात असतानाही ओंबळेंनी अतिरेकी कसाबला पकडून ठेवले. ओंबळे यांच्यामुळेच कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. कसाबने दिलेल्या माहितीवरूनच या संपूर्ण कटाचा तपास लागला. त्यामुळे भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणता आला. हॉटेल ताजमध्ये जवान संदीप उन्नीकृष्णन आणि नरिमन हाऊस येथे हवालदार गजेंद्र सिंग या राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण आले. या दोन्ही जवानांच्या अनन्यसाधारण बलिदानाला सलाम करीत त्यांनाही अशोकचक्राने सन्मानित करण्यात येणार असले, तरी या हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येकाचेच योगदान देशाच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सूत्रांनी या वेळी सांगितले.

(sakal,20 jan )

No comments: