ऍन्टॉप हिल : खरेदीदारासह सात जणांची टोळी गजाआड
तुम्ही काम करीत असलेल्या घराचा मालक काय करतो, त्याच्या घरातील कपाटात किती रक्कम असते, दागिने किती असतात हे सगळे पाहून ठेवा. संधी मिळताच ती चोरी करून माझ्याजवळ आणून द्या. त्याच्या विक्रीतून येणारे पैसे आपण सगळे वाटून घेत जाऊ, असे सांगत मलबार हिल येथील इमारतींत घरकाम करणाऱ्या पाच नोकरांना झटपट श्रीमंतीचा मार्ग दाखविणाऱ्या घरगड्याला चोरी केलेल्या मालाच्या खरेदीदारासह अटक करण्यात आली आहे. सात जणांच्या या टोळीने आजवर मलबार हिल परिसरात अनेक चोऱ्या केल्याचे उघडकीस येत आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आतापर्यंत साडेतीन लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
येथील एव्हरेस्ट इमारतीत राहणारे पुपू गोदवानी (वय 56) या चामड्याच्या व्यापाऱ्याच्या घरात झालेल्या चोरीनंतर घरगड्यांच्या या टोळीचा सुगावा पोलिसांना लागला. गोदवानी यांच्या घरात बबलू चौधरी (27), रोहितकुमार केवट (21) व सुभाष चौहान (20) हे तिघे घरगड्याचे काम करीत होते. त्यापैकी बबलूने मालकाच्या तिजोरीतून चार लाख 60 हजार रुपयांचे हिरेजडित दागिने 6 जानेवारीला चोरले. या प्रकरणी गोदवानी यांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. चोरी झाल्यानंतर बबलू त्याच्या गावी पाटणा येथे पळून गेला होता. पोलिसांनी संशयावरून त्याच्या साथीदार घरगड्यांकडे चौकशी केली असता, त्यांना बबलूच्या गावचा पत्ता मिळाला. पोलिसांनी बबलूला पाटणा येथे जाऊन अटक केली. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून या चोरीत घरातील अन्य दोन नोकर रोहितकुमार व सुभाष हेदेखील सामील असल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशीअंती त्यांनी ही चोरी शेजारच्याच एका इमारतीत घरगडी असलेल्या काशिनाथ जाधव (40) याच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले.
काशिनाथ या परिसरातील आणखी दोन घरगड्यांना सोबत घेऊन त्यांना चोरीचे धडे द्यायचा. सुटीच्या दिवशी तर हॅंगिंग गार्डनमध्ये बैठका घेऊन या घरगड्यांना तो चोरी करण्याबाबत माहिती द्यायचा. चोरी केलेला माल चिराबाजार येथे असलेल्या शशी वैद्य (27) या व्यापाऱ्याला तो विकायचा. चोरीच्या मालाच्या विक्रीतून आलेले लाखो रुपये अनेकदा तो चोरी केलेला ऐवज खोटा असल्याचे सांगून स्वतः हडप करीत होता. तो देईल तेवढे पैसे न घेतल्यास पोलिसांना कळविण्याची धमकीही ते देत होता हेदेखील चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंदनकुमार मंडल (20) व नवीनकुमार राय (24) या आणखी दोन घरगड्यांना अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.
(sakal,21 jan)
No comments:
Post a Comment