Wednesday, May 27, 2009

विद्यापीठातील उपनिबंधकाला 40 हजारांची लाच घेताना अटक

शहापूर येथील एका बी. एड. महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या उपनिबंधकाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फोर्ट येथील मुंबई विद्यापीठाच्या इमारतीतील कार्यालयात 40 हजार रुपये घेताना अटक केली. आज सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकाश मारुती गोसावी असे या लाचखोर उपनिबंधकाचे नाव आहे. शहापूर येथील एका शिक्षण संस्थेला बीएड महाविद्यालय सुरू करण्याची मंजुरी राज्य सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिली होती. या महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची संलग्नता मिळण्यासाठी संस्थेचे संस्थापक व अध्यक्षांनी विद्यापीठात अर्ज केला होता. यानंतर विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने डिसेंबर 2008 मध्ये महाविद्यालयाचे निरीक्षण करून जानेवारीमध्ये विद्यापीठाला अहवाल दिला होता. गेल्या महिन्यात विद्यापीठाच्या संलग्नता मान्यता विभागाचा उपनिबंधक प्रकाश गोसावी याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे संलग्नता मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार संस्थेच्या अध्यक्षांनी गोसावी याला दहा हजार रुपये दिले. लाचेचे उरलेले चाळीस हजार रुपये देण्याआधी त्यांनी याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार आज सायंकाळी फोर्ट येथील विद्यापीठाच्या इमारतीतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाकडून 40 हजार रुपये घेताना या पथकाने गोसावी याला अटक केली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत उपनिबंधकपदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यावर झालेली ही वर्षभरातील पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जाते.


(sakal,26th may)

No comments: