Sunday, May 24, 2009

टाटा' औषध गैरव्यवहारातील आरोपींची मुंबईत घरे

सीबीआय ः अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करणार

कर्करोगावरील उपचारासाठी देशात प्रख्यात असलेल्या परळच्या टाटा रुग्णालयातील शंभर कोटी रुपयांच्या औषध घोटाळ्याप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) या घोटाळ्यात अडकलेल्या सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुंबईत मोक्‍याच्या ठिकाणी घरे असल्याचे आढळले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी आज येथे दिली.

कर्करोगाच्या उपचाराकरिता परळचे टाटा रुग्णालय आशेचा किरण समजले जाते. रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या जीवरक्षक औषधांमुळे या रुग्णालयात उपचाराकरिता देशभरातून रुग्ण येतात. सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून कर्करुग्णांकरिता आणल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या औषधांचा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी अपहार करून त्याची खुल्या बाजारात विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. रुग्णालयात असलेल्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागाकडून तयार केल्या जाणाऱ्या "फंगीझोन' आणि "फंगीसम' या दोन प्रोटोकॉल मेडिसिनची मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री केली जात होती. या औषधांच्या एका डोसची किंमत सहा ते पंधरा हजार रुपये अथवा त्यापेक्षाही असते. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या औषध घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या चौकशीत सहाही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावे मुंबईत मोक्‍याच्या ठिकाणी घरे आढळली आहेत. तसेच बॅंकांमध्येही मोठ्या प्रमाणावर ठेवी तसेच सोन्याचे दागिनेही सापडले आहेत. या घोटाळ्यात रुग्णालयाच्या प्रशासन, लेखा आणि फार्मसी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून या प्रकरणात लवकरच आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सूतोवाचही सिंग यांनी या वेळी केले. या घोटाळ्यात सापडलेल्या सहा अधिकारी कर्मचाऱ्यांनाही लवकरच अटक केली जाणार असल्याचेही सिंग या वेळी म्हणाले.

(sakal,19 th may)

No comments: