Wednesday, May 27, 2009

समर्थ कामगार सेनेच्या कार्यालयावर हल्ला

राणेसमर्थकांना अटक ः फर्निचर, वाहनाची तोडफोड

समर्थ कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या अंधेरी येथील कार्यालयावर राणेसमर्थकांनी आज दुपारी हल्ला चढविला. या हल्ल्यात परब यांच्या कार्यालयातील फर्निचर आणि वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांच्या सहा समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्याच्या वेळी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून कामगार नेते जयवंत परब आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात वाढत असलेल्या कटुतेमुळे हा हल्ला झाल्याचे बोलले जाते.

अंधेरी पश्‍चिमेला डी. एन. नगर परिसरात गणेश चौक येथे असलेल्या समर्थ कामगार सेनेच्या कार्यालयावर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राणे समर्थकांनी हल्ला चढविला. या वेळी कार्यालयात असलेल्या नंदू कलगुटकर या कामगाराला मारहाण करून हल्लेखोरांनी कार्यालयातील सामानांची तोडफोड सुरू केली. या वेळी कार्यालयात कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी राजेश जाधव (40), नितीन नारायण (33), रामदत सुर्वे, अमिन तांडेल (30), संजय दोडके (36) आणि मेहूल जोशी (36) यांना अटक केली आहे. या हल्ल्याच्या वेळी नीतेश राणे हेही उपस्थित होते.

तीन वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या समर्थकांत कामगार नेते जयवंत परबही होते. या कालावधीत राणे यांनी सुरू केलेल्या समर्थ कामगार सेनेची धुरा श्रीकांत सरमळकर आणि जयवंत परब यांच्यावर सोपविण्यात आली. पक्षश्रेष्ठींविरुद्ध केलेल्या उघड बंडामुळे नारायण राणे यांना सहा महिन्यांपूर्वी कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले. मात्र, या वेळी राणे यांच्या भूमिकेला परब यांनी पाठिंबा दिला नव्हता. राणे यांच्यासोबत न जाण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे गेल्या काही महिन्यांपासून समर्थ कामगार सेनेत अंतर्गत वाद सुरू होते. राणे यांचे निलंबन मागे घेतल्यानंतरही राणेसमर्थक आणि जयवंत परबसमर्थकांत असलेली धुसफुस सुरूच होती. त्यातच लोकसभा निवडणुकीत राणे यांना परबसमर्थकांकडून फारसे सहकार्य न झाल्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे समर्थ कामगार सेनेचे चिटणीस दत्ता तांडेल यांनी "सकाळ'ला सांगितले. या वेळी राणेसमर्थकांनी 175 कंपन्यांच्या फाईल पळवून नेल्याचा आरोपही तांडेल यांनी या वेळी केला.

समर्थ कामगार सेनेच्या कार्यालयावर झालेला हल्ला कामगारांनी उत्स्फूर्तपणे केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून समर्थ कामगार सेनेचे संस्थापक नारायण राणे यांच्याविषयी अपशब्द वापरणे; तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली वावरणाऱ्या कामगारांवर अन्याय करण्याचे प्रकार संघटनेच्या कार्यालयातून सुरू होते. कामगारांच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी आपण या कार्यालयात गेलो. मात्र, काही कामगारांनी या ठिकाणी अचानक तोडफोडीला सुरुवात केली. आपण या प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य करीत असल्याचे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी "सकाळ'ला सांगितले.


(sakal,25th may)

No comments: