Wednesday, May 27, 2009

यापुढे पोलिसांना कमांडो प्रशिक्षण सक्तीचे

पी. पी. श्रीवास्तव ः दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी निर्णय

राज्य पोलिस दलात नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक पोलिस शिपायाला तीन महिन्यांचे कमांडो ट्रेनिंग सक्तीचे करण्यात आले आहे. पोलिस ठाण्यांच्या पातळीवरदेखील प्रत्येक पोलिसाला अत्याधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव यांनी दिली. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या घटनेला सहा महिने पूर्ण होत असतानाच पोलिसांकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

मुंबई हल्ल्यानंतर पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाकडे राज्य सरकारने अधिकाधिक लक्ष दिले आहे. अतिरेक्‍यांशी मुकाबला करण्याकरिता पोलिस दलात अत्याधुनिक शस्त्रे आणि सुरक्षा उपकरणांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून पोलिसांना आवश्‍यक तो निधीही उपलब्ध झाला आहे. बहुसंख्य अद्ययावत शस्त्रे व सुरक्षा उपकरणांची परदेशातून आयात करायची असल्याने त्यांना विलंब होत असल्याची कबुली श्रीवास्तव यांनी या वेळी दिली. शस्त्र आणि सुरक्षा उपकरणांची वाट न पाहता पोलिसांना दहशतवाद्यांशी मुकाबला करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हाताळण्याचे फारसे ज्ञान नसल्याचे उघडकीस आले. यानंतर प्रत्येक पोलिसाला अत्याधुनिक शस्त्रांच्या हाताळणीसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात "क्विक रिस्पॉन्स टीम'ची स्थापना करण्यात आली आहे. अतिरेकी हल्ला समर्थपणे परतवून लावण्यासाठी "फोर्स वन' पथक तयार केले जात असून या पथकाचे प्रशिक्षण पुण्यात सुरू आहे. अशाच प्रकारचे कमांडो प्रशिक्षण पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या सात हजार पोलिसांना देण्यात आले आहे. यापुढील काळात हे प्रशिक्षण सक्तीचे केले जाणार आहे.
पोलिसांनी सागरी सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. नौदल, सीमा सुरक्षा दल आणि पोलिस संयुक्तरीत्या मुंबईसह राज्याच्या सागरी सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील आहेत. या तिघांच्या संयुक्त उपक्रमातून अनेकदा समुद्रात "राहबंदी' लावण्यात येते. मुंबईत असलेल्या 54 लॅण्डिंग पॉइंटस्‌वर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचेही या वेळी श्रीवास्तव म्हणाले. या वेळी कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षक रश्‍मी शुक्‍ला व सुरक्षा व संरक्षण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विनय कारगावकर हेही उपस्थित होते.


(sakal, 26 th may)

No comments: