Tuesday, May 5, 2009

तीन चिमुकल्यांसह विवाहितेने जाळून घेतले

पतीशी भांडण ः दोघांचा मृत्यू; दोन जखमी

पतीशी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागाने एका विवाहितेने आपल्या तीन निष्पाप मुलांसह स्वतःला जाळून घेतल्याची हृदयद्रावक घटना मुलुंड येथे मध्यरात्री घडली. या घटनेत विवाहिता आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीचा शंभर टक्के भाजल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला; तर या आगीत होरपळल्याने तिची अन्य दोन मुले आणि वाचविण्यासाठी धावलेला तिचा पती जखमी झाला आहे. भाजलेल्या दोन मुलांवर ऐरोलीच्या बर्न्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती परिमंडळ- 7 चे पोलिस उपायुक्त राजकुमार व्हटकर यांनी दिली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलुंड पश्‍चिमेला विठ्ठलनगर येथील स्थानू इमारतीत ही मन हेलावणारी घटना घडली. या ठिकाणी राहणाऱ्या ज्योती कोरडे (26) यांचे पती दिलीप (30) सोबत काल रात्री जेवण वाढण्याच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले. सात वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्याला निशा (पाच वर्षे), सिद्धी (तीन वर्षे) आणि सुर्वेश (दोन महिने) अशी तीन मुले होती. कडाक्‍याच्या या भांडणानंतर दिलीप बाहेरच्या खोलीत झोपला; मात्र मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ज्योती तिच्यासोबत झोपलेल्या तिन्ही लहान मुलांना घेऊन किचनमध्ये गेली. किचनच्या दरवाजाला कडी लावून आपल्यावर आणि तिन्ही मुलांवर रॉकेल ओतून तिने पेटवून घेतले. आगीत होरपळणाऱ्या लहानग्यांनी आकांत केला. त्यांच्या किंकाळ्यांनी दिलीप जागा झाला. दरवाजाला आतून कडी लावली असल्याने त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने किचनचा दरवाजा तोडला. दिलीपने ज्योती आणि मुलांना आगीच्या ज्वाळांतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना मुलुंडच्या जनरल रुग्णालयात दाखल केले; मात्र शंभर टक्के भाजल्यामुळे ज्योती आणि तीन वर्षांची मुलगी सिद्धी मरण पावले. या आगीत होरपळून मुलगी निशा पंचवीस टक्के; तर दोन महिन्यांचा मुलगा सुर्वेश चाळीस टक्के भाजले आहेत. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही ऐरोलीच्या बर्न्स रुग्णालयात हलविल्याची माहिती पोलिस उपायुक्त राजकुमार व्हटकर यांनी दिली. या घटनेचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचेही व्हटकर यांनी सांगितले.

(sakal,27th april)

No comments: