Sunday, May 24, 2009

विर्क, रिबेरो आणि खोपडेंविरुद्ध कारवाईची मागणी करणार

ऍड्‌. संघराज रूपवते ः मनोहर कदमला सहानुभूती

रमाबाई आंबेडकरनगर येथे झालेल्या गोळीबारप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविलेला पोलिस उपनिरीक्षक मनोहर कदम याला "यंत्रणेचा बळी' ठरविल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांच्यासह दोन निवृत्त व सेवेत असलेला एक अशा चौघा आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली जाणार आहे. रमाबाईनगर येथील गोळीबारात मृतांच्या नातेवाईकांची न्यायालयात बाजू लावून धरणारे ऍड्‌. संघराज रूपवते यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

तब्बल बारा वर्षे चाललेल्या रमाबाईनगर गोळीबार प्रकरणाचा निकाल न्यायालयाने नुकताच दिला. या गोळीबाराबाबत राज्य राखीव पोलिस दलाचा उपनिरीक्षक मनोहर कदम याला पूर्णतः जबाबदार धरत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पोलिस दलातील वरिष्ठ; तसेच निवृत्त अधिकाऱ्यांनी उपनिरीक्षक मनोहर कदम याला सहानुभूती दर्शविणारी वक्तव्ये केली. अशातच काल पुणे येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी, कदम हा व्यवस्थेचा बळी असल्याचे वक्तव्य केले. सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेनंतर कदम यांचा अपिलाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा वेळी पोलिस महासंचालकांसह वरिष्ठ आय.पी.एस. अधिकाऱ्यांनी कदम याच्या कृत्याला सहानुभूती दर्शविणारे वक्तव्य करणे हे न्यायालयाचा अवमान करणारे; तसेच न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणारे असल्याचे रूपवते यांनी म्हटले आहे. माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो, वाय. पी. सिंग आणि सध्या पोलिस सेवेत असलेले आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, दोषी पोलिस उपनिरीक्षक मनोहर कदम याचे आजारपण हा एक बनाव असल्याचेही पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

विर्क यांनी माफी मागावी ः आठवले
पोलिस उपनिरीक्षक मनोहर कदम याच्याबाबत केलेल्या सहानुभूतीपूर्वक वक्तव्याबाबत राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी माफी मागावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली. याप्रकरणी आपण गृहमंत्री जयंत पाटील यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे आठवले म्हणाले. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या या वक्तव्याबाबत आपल्याला आश्‍चर्य वाटत असून, विर्क यांनी उपनिरीक्षक कदम याची बाजू घेणे हा पोलिस खात्याला कलंक असल्याचेही त्यांनी काढलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.



(sakal,13th may)

No comments: