Sunday, May 24, 2009

राशिद मलबारीला मुंबईत आणले

गुन्ह्यांची उकल होणार ः वरुण गांधींच्या हत्येची सुपारी घेतल्याचा आरोप

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि नवनिर्वाचित खासदार वरुण गांधी यांच्या हत्येची सुपारी घेतलेला छोटा शकीलचा विश्‍वासू साथीदार राशिद मलबारी याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री मुंबईत आणले. शकीलचा आणखी एक शार्पशूटर गुरप्रीतसिंग भुल्लर याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतेच बॅंकॉकहून मुंबईत आणले आहे. बॅंकॉकमध्ये छोटा राजनवरील हल्ल्यासह परदेशात मोठमोठे "गेम' वाजविणाऱ्या या दोघांच्या एकत्रित अटकेनंतर अंडरवर्ल्डमधील अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी व्यक्त केली आहे. छोटा राजनवरील हल्ल्यातील राशिदच्या सहभागाबद्दल थायलंड पोलिसांना कळविणार असल्याचेही मारिया यांनी सांगितले. दरम्यान, मलबारी याला आज न्यायालयाने 29 मे पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.

बंगळूरुच्या भटकळ येथे लपलेल्या राशिद मलबारीला केंद्रीय गुप्तचर विभाग आणि कर्नाटक पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली. छोटा शकीलचा विश्‍वासू साथीदार असलेल्या राशिदवर मुंबईत खून आणि खंडण्यांचे अनेक गुन्हे दाखल असल्याने मुंबई पोलिसांना तो हवा होता. राशिदला आणण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक कर्नाटक येथे गेले होते. या पथकाने त्याला काल रात्री उशिरा मुंबईत आणले असून 1996 मध्ये टिळकनगर येथे शब्बीर पठाण या गुंडाच्या हत्येप्रकरणी त्याची कस्टडी घेण्यात आली आहे.

छोटा शकीलसाठी राशिदने गुरप्रीतसिंग भुल्लर आणि आणखी पाच जणांच्या सोबतीने अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. 2005 मध्ये छोटा राजनवर बॅंकॉकमध्ये गोळीबार केल्यानंतर भुल्लर आणि राशिद हे दोघेही तेथून निसटले. अनेक दिवस ते छोटा राजनच्या मागावर होते. राशिद आणि भुल्लरसोबत त्या वेळी दोन पाकिस्तानी तरुणही होते. यानंतर दोघांनी छोटा राजन टोळीच्या एजाज लकडावालावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. 2005 मध्ये झालेल्या बाळू ढोकरे याच्या हत्येतही याच दोघांचा हात होता. 1998 मध्ये हुसैन वस्त्रा याच्या हत्येनंतर राशिद मलबारी दुबईत पळून गेला होता. त्यानंतर तो बरीच वर्षे बॅंकॉकमध्ये होता आणि नंतर तो नेपाळमध्ये पळून गेला होता.
राशिद आणि भुल्लर या दोघांच्या अटकेनंतर मुंबईच्या गुन्हेगारी जगतातील अनेक कोरी पाने भरता येतील, असे सूचक उद्‌गार सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी काढले आहेत. या दोघांची अटक छोटा शकील आणि छोटा राजन या दोन्ही टोळ्यांच्या प्रमुख गुंडांच्या परदेशातील वास्तव्याची ठिकाणे; तसेच त्यांच्या कारवायांची माहिती मिळेल, असेही मारिया या वेळी म्हणाले.


( sakal ,18 th may)

No comments: