Sunday, May 24, 2009

तीन वर्षांच्या अपहृत बालिकेची हत्या

गोरेगावात हळहळ : एका संशयिताला अटक

आठवडाभरापूर्वी गोरेगाव येथून अपहरण झालेल्या तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अपहृत मुलीचा मृतदेह याच परिसरातील संस्कारधाम हायस्कूलजवळ असलेल्या इलेक्‍ट्रीक मीटर केबिनमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गोरेगाव पश्‍चिमेला आदर्शनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या जैनब अमजद खान ही तीन वर्षीय मुलगी घरासमोर खेळत असताना 5 मे रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाली. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर जैनमच्या आईने या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, मात्र सायंकाळी घरासमोरच खेळणाऱ्या काही मुलांनी दिलेल्या माहितीनुसार जैनबला एक तरुण उचलून घेऊन निघून गेल्याचे तिच्या पालकांना समजले. यानंतर त्याच रात्री गोरेगाव पोलिस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्या शोधार्थ पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी वसई, विरार, कल्याण, नालासोपारा येथे पाठविण्यात आलेल्या पोलिस पथकांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नव्हते, मात्र आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जैनबचा मृतदेह तीन डोंगरी परिसरात असलेल्या संस्कारधाम हायस्कूलच्या शेजारी असलेल्या एका इलेक्‍ट्रिकल मीटर केबिनमध्ये नग्नावस्थेत आढळला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला. तपासाअंती हा मृतदेह 5 मे रोजी अपहरण झालेल्या जैनबचाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ही माहिती तिच्या घरच्या मंडळींना कळवून मृतदेह शवविच्छेदनाकरिता भगवती रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालात जैनबचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती गोरेगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूराव महाडीक यांनी दिली. जैनबचे वडील दोन वर्षे दुबईत नोकरीसाठी गेले होते. काही महिन्यांपूर्वी ते मुंबईत परत आले आहेत. जैनबच्या अपहरणानंतर तिच्या कुटुंबीयांकडे अपहरणकर्त्यांनी कसलीही मागणी केलेली नाही. त्यामुळे या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर जैनब राहत असलेल्या आदर्शनगर परिसरात एकच
हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी जैनबचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून, शवविच्छेदनानंतर फॉरेन्सिक तपासणीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी करण्यात येत असल्याचेही पोलिस निरीक्षक महाडीक यांनी सांगितले.दरम्यान, जैनब खान या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी शेखर पांडुरंग कीर (वय 32) या नराधमाला अटक केली आहे. कीर याने जैनबच्या हत्येची कबुली दिली आहे. यापूर्वीही त्याने नालासोपारा येथील एका लहान मुलीचे अपहरण करून, तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या प्रकरणाचा खटला न्यायालयात चालू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूराव महाडिक यांनी दिली. जैनबच्या हत्येचे कारण कीर याच्याकडून अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीला पाहण्यासाठी आदर्शनगर येथील नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर प्रचंड गर्दी केली होती. नागरिकांच्या जमावामुळे या परिसरातील वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला होता. पोलिसांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्यासमोर बंदोबस्त लावून संतप्त जमावाला पोलिस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावरून हटविल्याचे सूत्रांनी सांगितले.


(sakal,11thmay)

No comments: