Sunday, May 24, 2009

मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त

सुप्रकाश चक्रवर्ती ः मिरवणुकांना सशर्त परवानगी

तीन टप्प्यांत झालेल्या राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या 16 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकरिता राज्यात सर्वच मतमोजणी केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, विजयी मिरवणुकांच्या वेळी कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी या मिरवणुकांना सशर्त परवानगी दिली जाणार असल्याची माहिती पोलिस महासंचालक (निवडणूक) सुप्रकाश चक्रवर्ती यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

राज्यात लोकसभेच्या 48 जागांकरिता 16, 23 आणि 30 एप्रिल रोजी मतदान झाले. मतदारराजाने कोणत्या पक्षाला आपल्या मतांचा कौल दिला आहे हे 16 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या दिवशी मतमोजणी केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार न होता मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी राज्य पोलिस दल सज्ज झाले आहे. मतमोजणी केंद्रांपासून शंभर मीटर अंतराच्या परिसरात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश करता येणार नाही. संवेदनशील मतदारसंघांतील मतमोजणी केंद्रांवर राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेतली जाणार आहे. मतमोजणी केंद्रांवर विविध पक्षांच्या गटांत वाद; तसेच हमरीतुमरी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेषत्वाने खबरदारी घेण्यात येत असल्याचेही चक्रवर्ती यांनी या वेळी सांगितले.
शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यातील सर्वच मतमोजणी केंद्रांवरील निकाल हाती येणे अपेक्षित आहे. जिंकलेल्या उमेदवारांच्या विजयी मिरवणुकांना त्यांचे मिरवणुकीचे मार्ग कोणते आहेत ते पाहूनच पोलिस परवानगी दिली जाणार आहे. अनेकदा काही अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे पराभूत झालेल्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कुरापती काढण्याचे प्रकार घडतात. सुरुवातीला क्षुल्लक असलेल्या या वादातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे मतमोजणी आणि विजयी मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी सावधगिरी बाळगण्यात येत असल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा व पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील युनिट कमांडर मतमोजणीसाठीच्या या बंदोबस्तावर विशेषत्वाने लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


(sakal,14th may)

No comments: