Sunday, May 24, 2009

मराठी मतांच्या विभाजनामुळे गायकवाड यांचा विजय सुकर

दक्षिण-मध्य मुंबई विश्‍लेषण



केंद्र सरकारकडून धारावीच्या विकासासाठी आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी, मतदारसंघाच्या विकासासाठी केलेली धडपड, सामान्य नागरिकांच्या लहानसहान कामांना दिलेला वाव यांच्यासह ऐनवेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराच्या स्वरूपात शिवसेनेच्या मतांचे झालेले विभाजन या जमेच्या बाजूंच्या जोरावर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड विक्रमी मताधिक्‍यांनी निवडून आले. या मतदारसंघांतून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या गायकवाड यांच्यापुढे आता "धारावी विकास प्रकल्पा'च्या सुनियोजित अंमलबजावणीचे आव्हान आहे.

धारावी, शीव, माहीम, वडाळा, चेंबूर आणि अणुशक्तीनगर अशी संमिश्र लोकसंख्या असलेला दक्षिण-मध्य मुंबई हा गायकवाड यांचा लोकसभा मतदारसंघ. तब्बल 15 लाख मतदार असलेल्या या मतदारसंघावर तसे कॉंग्रेस आघाडीचेच वर्चस्व. या ठिकाणी कॉंग्रेसचे पाच आमदार आणि 24 नगरसेवक आहेत. त्यामुळे या जागेवर निवडून येण्यासाठी गायकवाड यांना फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत असेच सुरुवातीच्या काळात चित्र होते; मात्र वर्षभरापूर्वी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मराठी मतदारांना साद घालणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने श्‍वेता परूळकर यांना रणांगणात उतरवल्यानंतर गायकवाड यांची ही लढत तेवढी सोपी नव्हती हे स्पष्ट झाले. या मतदारसंघात उभे असलेले बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांचे उमेदवार गायकवाड यांच्या मतांच्या विभाजनाला कारणीभूत ठरणार होते. त्यामुळेच या मतदारसंघात होणारी लढत तशी चुरशीची ठरणार होती. वरवर तिरंगी वाटणाऱ्या या लढतीत बहुजन समाज तसेच अल्पसंख्याकांच्या मतांचे होणारे संभाव्य विभाजन रोखण्यासाठी कॉंग्रेस आघाडीतून प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली.

एकनाथ गायकवाड यांना विजयी करण्यासाठी आघाडीतील सर्वच पक्षांनी काम केल्याचे दिसत असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार श्‍वेता परूळकर यांनी घेतलेली तब्बल एक लाख आठ हजार 341 मते ही कॉंग्रेसच्या पथ्यावर पडली असेच म्हणावे लागेल. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुरेश गंभीर यांना पडलेली मते आणि श्‍वेता परूळकर यांना मिळालेल्या मतांची बेरीज केली असता सुरेश गंभीर चांगल्या फरकाने विजयी झाले असते असे दिसून येते. मराठी मतदारांनी शिवसेनेऐवजी मनसेला पसंती दिली. गेल्या निवडणुकीत शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा पराभव करून एकनाथ गायकवाड जायंट किलर ठरले होते. त्यापूर्वी याच मतदारसंघातून ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. या सगळ्या बाबी असल्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसता तर गायकवाड यांना यंदाची निवडणूक जिंकणे जड गेले असते.
या मतदारसंघात साडेसहा लाख मराठी मतदार आहेत. त्यांच्या अपेक्षांची पूर्तताही गायकवाड यांना करावी लागणार आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा सर्वांगीण विकास हाच गायकवाड यांच्या कामाचा अजेंडा राहणार आहे. या ठिकाणी गेली अनेक वर्षे राहणाऱ्या सर्वसामान्य झोपडीवासीयांना किमान 350 चौरस फुटांचे घर उपलब्ध करण्यासाठी तसेच या ठिकाणी असलेल्या लघुउद्योगांच्या वाढीला चालना देण्यासाठी त्यांना प्रामुख्याने प्रयत्न करावे लागणार आहेत. "धारावी डेव्हलपमेंट'च्या नावे होणाऱ्या या मतदारसंघाच्या विकासासाठी गायकवाड यांना प्रकर्षाने प्रयत्न करावे लागतील, हे निश्‍चित.


(sakal,16 th may)

No comments: