Sunday, May 24, 2009

बनावट "एके-47'ने पोलिसांची गफलत

निनावी दूरध्वनी ः चित्रीकरणासाठी होणार होता वापर

पोलिस नियंत्रण कक्षातील दूरध्वनी खणाणतो... साधारण पन्नाशीतील एक व्यक्ती प्राणघातक शस्त्रांचा साठा टॅक्‍सीतून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळते. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आलेल्या दूरध्वनीमुळे पोलिसही हबकतात आणि मग टॅक्‍सीचा पाठलाग सुरू होतो... पोलिसांना संशयास्पद टॅक्‍सी सापडते... प्राणघातक शस्त्रसाठाही सापडतो; पण ते संबंधित व्यक्तीला सोडून देतात... कारण हा शस्त्रसाठा असतो नकली!
मंगळवारची सायंकाळ मुंबई पोलिसांसाठी जरा धावपळीची ठरली. निनावी दूरध्वनीवरून एके-47 रायफली घेऊन एक व्यक्ती टॅक्‍सीतून फिरत असल्याचा निरोप मिळाल्याने तेही सावध होतात.
पुढच्याच क्षणात हा संदेश वायरलेसवरून शहरात पाठवून पोलिसांना खबरदारीचा इशारा दिला जातो. माटुंगा पोलिसांच्या असॉल्ट मोबाईलला ती संशयास्पद टॅक्‍सी आढळते. पोलिस या टॅक्‍सीला थांबवून आत बसलेल्या व्यक्तीची विचारपूस करतात. तिच्याकडे असलेल्या सहा "एके-47' रायफल पाहून एक क्षण पोलिसांनाही काय करावे ते सूचत नाही; मात्र पुढच्याच क्षणात टॅक्‍सीत बसलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांची झालेली गफलत लक्षात येते. तो लगेचच आपल्याकडे असलेल्या सर्व रायफली बनावट असून, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्या पुण्याला नेत असल्याचे सांगतो आणि एवढा वेळ टॅक्‍सीच्या मागावर असलेले पोलिस सुटकेचा निःश्‍वास सोडतात...
माटुंगा पोलिसांसोबत काल सायंकाळी घडलेल्या या किश्‍श्‍याची चांगलीच चर्चा आज दिवसभर पोलिस दलात होती. काल सायंकाळी चारच्या सुमारास एका सजग नागरिकाने दादर - टीटी येथून टॅक्‍सी पकडून जात असलेल्या एका व्यक्तीला सोबत प्राणघातक शस्त्रे घेऊन जाताना पाहिले आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. खार पश्‍चिमेला जवाहरनगर येथे राहणारे रमेश श्रीपती शिंदे हा बनावट शस्त्रसाठा घेऊन जात होते. पोलिसांनी त्यांना सुरुवातीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेली ही शस्त्रे बनावट असल्याची खात्री करून घेतली. "मूव्ही ऍक्‍शन डमी इफेक्‍ट असोसिएशन' या संस्थेत नोकरी करीत असलेल्या शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेला या शस्त्रांचा परवाना आणि आवश्‍यक ती कागदपत्रे पोलिसांना दाखविल्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली. सखोल चौकशीअंती पोलिसांनी हस्तगत केलेली शस्त्रे पुन्हा शिंदे यांच्या ताब्यात दिली आणि या प्रकरणावर पडदा पडला.



(sakal,13th may)

No comments: