Sunday, May 10, 2009

अंबानी हेलिकॉप्टर - "एअरवर्क्‍स'च्या दोघांना अटक

घातपाताचा प्रयत्न ः भारत बोरगेंमुळेच कट उघडकीस

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत दगड आणि मुरूम टाकल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या हेलिकॉप्टरची देखभाल करणाऱ्या एअरवर्क्‍स इंजिनियरिंग कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना काल रात्री पावणेबारा वाजता अटक केली. या दोघांच्या चौकशीत हा प्रकार कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेच्या वादातून झाल्याचे उघडकीस आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज दिली. आरोपींनी केलेल्या या कृत्यामुळे हेलिकॉप्टरच्या होणाऱ्या संभाव्य हानीसंबंधी तज्ज्ञांकडून येणारा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. विलेपार्ले रेल्वेस्थानकात उपनगरीय गाडीखाली आत्महत्या करणारे "एअरवर्क्‍स'चे तंत्रज्ञ भारत बोरगे यांच्या सतर्कतेमुळेच हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याचेही मारिया यांनी या वेळी सांगितले.
उदय मनोहर वारेकर (वय 32) व पलराज गणपती थेवर (48) अशी या अटकेतील आरोपींची नावे आहेत. "एअरवर्क्‍स इंजिनियरिंग'मध्ये हे दोघेही हेल्पर म्हणून काम करीत होते. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बेल-412 या 13 आसनी हेलिकॉप्टरच्या इंधनटाकी व गिअर बॉक्‍समध्ये लहान दगड आणि मुरूम आढळले होते. 23 एप्रिल रोजी सायंकाळी या हेलिकॉप्टरची देखभाल करणारे तंत्रज्ञ भारत बोरगे यांनी हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीची पाहणी केल्यानंतर उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. 28 एप्रिल रोजी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणणारे तंत्रज्ञ भारत बोरगे यांनी विलेपार्ले रेल्वेस्थानकात चर्चगेटला जाणाऱ्या उपनगरी गाडीखाली आत्महत्या केल्यामुळे याबाबतचे गूढ अधिक वाढले होते.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने एअरवर्क्‍स कंपनी आणि तेथे कार्यरत असलेल्या युनियनशी संबंधित 70 हून अधिक कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यानंतर त्यांनी उदय वारेकर व पलराज थेवर या दोघांना काल रात्री पावणेबारा वाजता अटक केली. या वेळी चौकशीत कंपनी व्यवस्थापन आणि महाराष्ट्र जनरल कामगार महासंघाशी संबंधित 52 कर्मचाऱ्यांमध्ये 1995 पासून सुरू असलेल्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. 24 एप्रिल रोजी हेलिकॉप्टरचे उड्डाण होणार असल्याने 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तंत्रज्ञ भारत बोरगे यांनी त्याच्या मेंटेनन्ससचे काम सुरू केले. देखभाल-दुरुस्तीनंतर वारेकर व थेवर हे दोघेही हेलिकॉप्टर धुण्यासाठी म्हणून तेथे गेले. त्यानंतर संधी मिळताच वारेकर याने इंधनटाकीत लहान दगड व मुरूम टाकला होता. अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आढळलेल्या दगड व मुरुमामुळे होणाऱ्या संभाव्य हानीसंबंधी गुन्हे शाखेने डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या तज्ज्ञांकडून अहवाल मागविला आहे. हा अहवाल आल्यानंतर या घटनेमागील गांभीर्य अधिक स्पष्ट होईल, असेही मारिया यांनी सांगितले. यापूर्वीही कंपनीत अशाच प्रकारच्या पाच घटना घडल्या आहेत. त्यापैकी दोन घटनांशी वारेकर व थेवर यांचा संबंध असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या दोघांना 15 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(चौकट)
यापूर्वीचे घातपाताचे प्रयत्न
27 ऑगस्ट 2008 ः हॅंगरवर उभ्या असलेल्या एका हेलिकॉप्टरवर कर्मचाऱ्यांनी वीट फेकली.
27 ऑक्‍टोबर 2008 ः हॅंगरच्या परिसरात उभ्या असलेल्या विमानाजवळ सुतळी बॉम्ब फोडला.
3 जानेवारी 2009 ः कंपनीच्या आवारात दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरजवळ सुतळी बॉम्ब फोडण्यात आले. या वेळी जवळच एक पेट्रोल भरलेला कॅनही ठेवण्यात आला. फटाक्‍यांमुळे लागलेली आग विझविण्यात आली. याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
6 मार्च 2009 ः कंपनीच्या हॅंगरमध्ये असलेल्या एका कपाटात फटाके फोडण्यात आले. या वेळीही तेथे पेट्रोल भरलेला कॅन ठेवण्यात आला होता.
---------------
असा उघडकीस आला कट...!
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्सचे काम 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते. "एअरवर्क्‍स'चे तंत्रज्ञ भारत बोरगे यांनी हेलिकॉप्टरची तपासणी केल्यानंतर दुपारी उदय वारेकर व पलराज थेवरला हेलिकॉप्टरची स्वच्छता करण्यास सांगितले. संधी मिळताच दोघांनी हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत व गिअर बॉक्‍समध्ये दगड व मुरूम टाकले. सायंकाळी पुन्हा एकदा बोरगे हेलिकॉप्टरची पाहणी करायला आले. तेव्हा इंधनटाकीचे झाकण योग्य प्रकारे बसविले नसल्याचे आढळले. सकाळीच केलेल्या पाहणीच्या वेळी आपण स्वतः इंधनटाकीचे झाकण लावल्यामुळे सायंकाळी ते कोणीतरी उघडून पुन्हा चुकीच्या पद्धतीने बसविल्याचे बोरगे यांना जाणवले. त्यांनी झाकण उघडून पाहिल्यानंतर इंधनटाकीत मुरूम आणि गिअर बॉक्‍समध्ये दगड टाकल्याचे त्यांना आढळले. ही माहिती त्यांनी तातडीने कंपनी व्यवस्थापक सुधाकर सुर्वे यांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

(sakal,4th may)

No comments: