Sunday, May 24, 2009

कसाबच्या जबाबाची प्रत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे

परराष्ट्र मंत्रालय पाककडे पुरावा सोपविणार

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या कबुली जबाबाची प्रत गुन्हे शाखेने नुकतीच केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपविली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही प्रत पुराव्याच्या स्वरूपात पाकिस्तानकडे सुपूर्द केल्याचे वृत्त आहे.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. खटल्याच्या सुरुवातीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल दहा हजारहून अधिक पानांचे आरोपपत्र न्यायालयासोबतच केंद्रीय गृहखात्याकडेही दिले होते. अतिरेकी कसाबने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला कबुली जबाब गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात दिला नव्हता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना या कबुली जबाबाची प्रत उपलब्ध मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने ही प्रत विशेष न्यायालय; तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाकडे दोन आठवड्यांपूर्वी दिली आहे. केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कसाबच्या कबुली जबाबाची ही प्रत पाकिस्तानला पुरावा म्हणून दिल्याचे सांगण्यात येते.


(sakal, 20th may)

No comments: