Tuesday, May 5, 2009

एअरवर्क्‍स'विरोधात महासंघ औद्योगिक न्यायालयात जाणार

अंबानी हेलिकॉप्टर ः कामगारविरोधी कृतीबाबत निषेध

अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत मुरूम आणि दगड टाकण्याच्या उघडकीस आलेल्या गंभीर प्रकारानंतर या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत एअरवर्क्‍स इंडिया इंजिनिअरिंग कंपनीतील 52 कामगारांना कामावर येण्यास कंपनी व्यवस्थापनाने मज्जाव केल्याप्रकरणी महाराष्ट्र जनरल कामगार महासंघाने औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एअरवर्क्‍स कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
अनिल अंबानी यांच्या मुंबई विमानतळावर उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये अनोळखी व्यक्तीने दगड आणि मुरूम टाकल्याचे प्रकरण 23 एप्रिलला उघडकीस आले. या घटनेमागे अंबानी यांच्या हत्येचा कट असण्याची शक्‍यता वर्तवीत हे प्रकरण गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले. या प्रकरणाची एअरवर्क्‍स कंपनीने गांभीर्याने दखल घेत त्यांच्या 180 पैकी 52 कामगारांना चौकशी पूर्ण होईपर्यंत कामावर येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यरत असलेल्या कामगार संघटनेत असंतोष आहे. कामगारांसोबत सुरू असलेल्या जुन्या वादातूनच 52 कामगारांवर हा सूड उगवल्याचा आरोप महाराष्ट्र जनरल कामगार महासंघाने केला आहे. यासंबंधी त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. कंपनीच्या विरोधात कामगारांच्या प्रश्‍नांबाबत 2002 पासून औद्योगिक आणि मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करून महासंघाने कायदेशीर लढा सुरू केला. त्यामुळे अनेकदा कंपनी व्यवस्थापनाने कामगारांबाबत उदासीन आणि निर्दयी धोरण स्वीकारले. 2003 पासून कंपनीने कामगारांना बोनसही दिलेला नाही. याशिवाय यापूर्वी कंपनीत फटाके वाजविण्याचे प्रकरण घडवून आणत त्याचा दोषही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांवर ठेवला. अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाप्रकरणी महासंघाच्याच दोन कामगारांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा देण्यात यावी; परंतु या घटनेचा फायदा घेत कामगारांना व्यवस्थापनाने नाहक त्रास देऊ नये, असे या पत्रकात म्हटले आहे. कंपनीने कामावर येण्यास मज्जाव केलेल्या कामगारांना पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी कामगार महासंघ औद्योगिक न्यायालयात जात असल्याचेही संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.


(sakal,26th april)

No comments: