Sunday, May 24, 2009

पावसामुळे ठिक-ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा

दक्षिण आणि मध्य मुंबईसह पश्‍चिम उपनगरात पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे आज सायंकाळी या उपनगरातील रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक शाखेचे पोलिस रात्री उशिरापर्यंत अचानक पडलेल्या शिडकाव्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करताना ठिक-ठिकाणी दिसत होते.
मुंबईत आज सायंकाळी पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने कासवगतीने चालत होती. चेंबूरचा अमरमहाल उड्डाणपूल, विक्रोळी एसव्हीएलआर उड्डाणपूल, जोगेश्‍वरी- विक्रोळी लिंकरोड, माहीमचा सेनापती बापट मार्ग, माहीम चर्च तसेच गोरेगाव येथील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा बोजवारा उडाला. पावसामुळे निसरड्या झालेल्या या रस्त्यांवर ठिक-ठिकाणी सांडलेल्या वाहनातील तेलामुळे दुचाकी वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. त्यातच ठिक-ठिकाणी सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांमुळे रस्त्यांवर चांगलाच चिखल निर्माण झाला होता. नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईत येणारे कित्येक वाहनचालक सायंकाळच्या सुमारास घरी परतत असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या वेगाला चांगलाच ब्रेक लागला होता. पावसामुळे झालेली ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस रात्री उशिरापर्यंत ठिक-ठिकाणी तैनात होते. पावसामुळे चिखलमय झालेल्या रस्त्यांवर दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या अपघातांच्या किरकोळ घटना घडल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिली.


(sakal,20th may)

No comments: