Sunday, May 10, 2009

तो दिवस आठवला की अंगावर काटा उभा राहतो...

विजय गायकवाड ः रमाबाईनगर गोळीबारातील जखमी

" 11 जुलै 1997 ची ती सकाळ. सव्वासात वाजले असावेत. व्हिडीओ भाड्याने देण्याचा धंदा असल्याने नेहमीप्रमाणे आदल्या रात्री उशिरा झोपलो होतो. सकाळी सातला उठलो. डोळ्यावर थोडीशी झोप होतीच. बाहेर काय झालंय याची जराही कल्पना नव्हती. मी घरासमोरून आजच्या पवार चौकाच्या दिशेने जात होतो तोच अचानक आलेल्या गोळीने माझ्या गळ्याचा वेध घेतला. मला धाडकन जमिनीवर कोसळताना मावशी बनाबाई खरात यांनी पाहिले आणि त्या धावतच आल्या. दहा दिवसांनी मला शुद्ध आली. त्या दिवशी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू असल्याचे मला कळले. "त्या' दिवशी झालेल्या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू, तर कित्येक जण गंभीर जखमी झाल्याचे समजले. माझ्यासोबत ज्यांना गोळ्या लागल्या त्यात तिघे जखमी झाले; तर एक निष्पाप तरुण मरण पावला. आजही तो दिवस आठवला तरी अंगावर काटा येतो केवळ नशिबाची साथ होती म्हणून वाचलो,' अशी प्रतिक्रिया या गोळीबारातून बालंबाल बचावलेला विजय गायकवाड याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
रमाबाई आंबेडकरनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात विजय गायकवाड सारखे कितीतरी निष्पाप जखमी झाले. त्या दिवशी पोलिसांनी घडविलेल्या संहाराची माहिती सांगताना विजयचे चमकणारे डोळे काळजाचा ठोका चुकवत होते. मला ज्या ठिकाणी गोळी लागली त्याच ठिकाणी हिरामण गायकवाड, बबलू वर्मा, सुदेवी गिरी आणि बापू कोळेकर यांनाही गोळ्या लागल्या. त्यात बबलू वर्मा मरण पावला. त्याच्या छातीची चाळण झाली होती. सुदेवी गिरी ही पस्तीसवर्षीय महिला तर एका क्षणासाठी त्या वेळी अवघा तीन वर्षांचा असलेला त्यांचा मुलगा राहुल याला घेण्यासाठी जात होती. तोच मागून आलेल्या दोन गोळ्या त्यांच्या हाताच्या पंजात तसेच दंडात शिरल्या. गेली बारा वर्षे आम्ही न्यायासाठी झगडत होतो. आज न्यायालयाच्या निकालानंतर आम्हाला समाधान वाटते. सरकारने या घटनेनंतर आम्हा जखमींना सर्व प्रकारची मदत केली. पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्यांना केंद्र सरकारने रेल्वेत कायमस्वरूपी नोकरीत घेतले. गेली कित्येक वर्षे आमच्यापैकी आठ जखमी न्यायालयाच्या तारखांना सतत हजर राहात होतो. अखेर आज न्याय मिळाला, असे सांगताना विजयचा आनंद लपत नव्हता

(sakal, 7th may)

No comments: