Sunday, May 24, 2009

धाडसी कामगिरी करणाऱ्या 49 पोलिसांचा गौरव

आयुक्तांच्या हस्ते सन्मान ः पोलिस महासंचालक पदकांचे वितरण

मुंबई पोलिस दलात उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या पोलिस महासंचालकांच्या गुणवत्ता पदकांचे वितरण आज पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्या हस्ते करण्यात आले. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय धाडस दाखविलेल्या बॉम्बशोधक आणि विनाशक पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह तब्बल 49 पोलिस अधिकारी - कर्मचारी यंदा या पदकाचे मानकरी ठरले आहेत.

आझाद मैदान पोलिस क्‍लब येथे दुपारी झालेल्या या पदकवितरण कार्यक्रमाला पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्यासह प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद, गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. 2008 मध्ये केलेल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल ही पदके प्रदान करण्यात आली. प्रशंसनीय सेवेबद्दल अतिरिक्त पोलिस आयुक्त अर्चना त्यागी, पोलिस उपायुक्त अमर जाधव, शशिकांत महावरकर आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त डी. जी. होटकर यांना गौरविण्यात आले. या पदकांवर 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी जिवाची बाजी लावून अतिरेक्‍यांनी ठेवलेल्या बॉम्बचा शोध घेऊन ते निकामी करण्याची कामगिरी बजावलेल्या बॉम्बशोधक व विनाशक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेषत्वाने गौरव करण्यात आला. या पथकाचे पोलिस निरीक्षक स्टिवन अँथोनी, एकनाथ खोल्लम, पोलिस उपनिरीक्षक सचिन गावडे, दीपक सावंत, आल्हाद टेंबुलकर, विलास राणे, बाळकृष्ण घाडीगावकर, मनोज शेडगे, राजू पाटील, प्रकाश वाडकर, राजेंद्र गोडसे, पोलिस शिपाई सुभाष गावडे, किशोर नावर, नितीन लाड, आशिष महाडिक, विवेक नार्वेकर, आनंद देवार्डेकर, रवींद्र अडसूळ, गुरूनाथ नार्वेकर, महेंद्र केसरकर, माहीम पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार विलास गणेशकर यांना ही पदके देण्यात आली.
याशिवाय क्‍लिष्ट व बहुचर्चित गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल डोंगरी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल नलावडे, मरोळच्या सशस्त्र पोलिस मुख्यालयातील विलासराव चंदनशिवे, मालवणीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयवंत हरगुडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अभय शास्त्री, मलबार हिल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इक्‍बाल शेख , सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीव नारकर, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश कदम, समाजसेवा शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीपत पाटील, जोगेश्‍वरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनंत दळवी, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अरुण अदम, पोलिस हवालदार किसन घुगे, गजानन चौगुले, पोलिस नाईक हेमंत राणे, लहू चव्हाण, जयवंत सकपाळ, प्रकाश देसाई, सुनील देसाई, शिवाजी सावंत यांना पदके देण्यात आली. निष्कलंक सेवेबद्दल आग्रीपाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र खंडागळे तर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक सुरेश मगदुम यांना गौरविण्यात आले. मुंबई पोलिस इन्फोलाईन, एल्डरलाईनमधील प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस उपनिरीक्षक फिरोज पटेल, जनतेत पोलिसांची प्रतिमा उंचाविण्याची कामगिरी बजावल्याबद्दल विनोद विचारे यांना महासंचालकांच्या पदकाने सन्मानित करण्यात आले.


(sakal,13th may)

No comments: