तरुणाला अटक ः सोनसाखळी चोरीचे तब्बल सव्वीस गुन्हे
तेरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या तरुणाला चारकोप पोलिसांनी अटक केली. दोन आठवड्यांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची कबुलीही त्याने दिली. काही वर्षांपूर्वी अमेरिकेहून परतलेल्या या तरुणावर सोनसाखळी चोरीचे तब्बल सव्वीस गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
प्रीतेश गणेश दोशी (24) असे या आरोपीचे नाव आहे. मालाडच्या एस.व्ही.रोडवर राहणारा हा गुन्हेगार काल दुपारी मालाड येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थिनीला वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करून रिक्षातून मढ आयलंड येथे घेऊन गेला. या वेळी विद्यार्थिनीच्या मैत्रिणींनी हा प्रकार तिच्या आईला कळविला. तिने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार चारकोप पोलिस ठाण्यात दाखल केली. दोन तासांनंतर ही मुलगी परत तिच्या घरी रिक्षाने आली. मढ आयलंड येथील एका रिसॉर्टमध्ये नेऊन त्याने आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने आईला सांगितले. या प्रकरणी चारकोप पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलीला पोलिस ठाण्यात असलेल्या रेकॉर्डवरील आरोपींच्या छायाचित्रांची ओळख पटविण्यास दिल्यानंतर त्यातील एकाला तिने ओळखले. या छायाचित्रांद्वारेच पोलिसांनी प्रीतेश दोशीला काल रात्री अटक केली.
दोन आठवड्यांपूर्वी बॉलिवूडमधील अभिनेत्याच्या तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्याशीही अतिप्रसंग केल्याची कबुलीही प्रीतेशने अधिक चौकशीत पोलिसांना दिली आहे. या अभिनेत्याच्या मुलीला आरोपीची ओळख पटविण्याकरिता आज चारकोप पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेहून परतलेल्या या विकृत तरुणावर मुंबईत सोनसाखळी चोरीचे तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सहा चारकोप पोलिस ठाण्याच्या हद्दीतच दाखल आहेत. त्याला आज न्यायालयाने 25 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती चारकोप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. एस. गावंडे यांनी दिली.
(sakal, 20th may)
No comments:
Post a Comment