Tuesday, May 5, 2009

मोटरमन-गार्ड यांच्या जबाबानुसार भारत बोरगे यांची आत्महत्याच!

गूढ कायम : कुटुंबीयांची सीबीआय चौकशीची मागणी

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत दगड आणि मुरूम सापडल्याच्या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असलेला एअरवर्क्‍स इंडिया इंजिनिअरिंग कंपनीचा कर्मचारी भारत बोरगे यांच्या विलेपार्ले रेल्वेस्थानकाजवळ झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी रेल्वे पोलिसांनी मोटरमन आणि गार्डसह पाच जणांचे जबाब आज नोंदवून घेतले आहेत. या पाचही जणांच्या जबाबानुसार हा प्रकार आत्महत्येचाच असल्याची पुष्टी मिळत असल्याची माहिती रेल्वे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी दिली. या प्रकरणी लवकरच रिलायन्स आणि एअरवर्क्‍स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
दरम्यान, बोरगे यांच्या पार्थिवावर सातारा येथील कुंभारवाडी या त्यांच्या गावी आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबीय सध्या गावीच आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी "सकाळ'शी बोलताना केली.
विलेपार्ले रेल्वेस्थानकात रूळ ओलांडताना चर्चगेटकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीने धडक दिल्याने काल सकाळी आठच्या सुमारास बोरगे यांचा मृत्यू झाला. अंबानी हेलिकॉप्टर प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार असलेल्या बोरगे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. हेलिकॉप्टरची देखभाल करणाऱ्या एअरवर्क्‍स इंडिया इंजिनिअरिंग कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या बारेगे यांनीच हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत दगड आणि मुरूम सापडल्याची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे केली होती. या घटनेनंतर गेल्या काही दिवसांपासून बोरगे तणावग्रस्त होते. काल सकाळी भाईंदरमधील आपल्या घरातून कामाला जाण्यासाठी निघालेले बोरगे पहिल्यांदाच विलेपार्ले रेल्वेस्थानकात उतरले. सकाळी आठच्या सुमारास चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. या लोकलचे मोटरमन पिल्लई, गार्ड दिलीपकुमार, दोन अन्य कामगार आणि स्थानकात वृत्तपत्र विकणारा आशीष जाधव अशा पाच जणांना आज रेल्वे पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार रेल्वेमार्गावर आलेले बोरगे चर्चगेटला जाणाऱ्या रेल्वेसमोरच रुळावर बसले. त्यामुळे हा प्रकार आत्महत्येचाच असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्याचे शर्मा यांनी सांगितले. नेहमी सांताक्रूझ रेल्वेस्थानकात उतरून तेथून रिक्षाने आपल्या कंपनीत जाणारे बोरगे विलेपार्ले स्थानकात का उतरले, याची चौकशी करण्यात येत आहे. अपघाताच्या 16 मिनिटे आधी त्यांचे भांडुपला राहणाऱ्या आपल्या मोठ्या भावाशी, आनंद बोरगे यांच्याशी बोलणे झाले होते. मृत्यूपूर्वी बोरगे यांचे अन्य कोणाशी बोलणे झाले होते का, याचीही चौकशी पोलिस करीत आहेत. अंबानी यांच्या हेलिकॉप्टर प्रकरणात बोरगे यांच्याकडे गेलेल्या रिलायन्सच्या "त्या' कर्मचाऱ्यांचाही शोध सुरू आहे. मृत्यूनंतर ब
ोरगे यांच्याकडे सापडलेल्या पत्रातील हस्ताक्षर त्यांचेच असल्याची माहिती आनंद बोरगे यांनी पोलिसांना दिली आहे.

सीबीआय चौकशी करा
तीन वर्षांपासून एअरवर्क्‍स कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कामाला असलेले बोरगे लष्करातून अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. मृदू स्वभाव असलेले बोरगे आत्महत्या करूच शकत नाहीत. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आमच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, अशी माहिती बोरगे यांचे मावसभाऊ संभाजी बोटरे यांनी "सकाळ'ला दिली. बोरगे यांची पत्नी 14 एप्रिलला मुले अक्षय (16), अभिजित (11) आणि मुलगी अन्नू (18) यांच्यासोबत सुट्टीनिमित्त गावी आली होती, असेही त्यांनी सांगितले.

हेलिकॉप्टर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने : मारिया
भारत बोरगे यांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जबाब नोंदवून घेतला होता. सोमवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एअरवर्क्‍स कंपनीचा अभियंता वाराप्रसाद यांच्यासोबत बोरगे पुन्हा आले होते. त्यांच्यासोबत जबाब नोंदविण्यात आलेल्या अन्य साक्षीदारांच्या जबाबाच्या मदतीने अंबानी हेलिकॉप्टर प्रकरणाच्या तपासावर अधिक प्रकाश टाकला जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या प्रकरणातील आपला तपास योग्य दिशेने सुरू असून, लवकरच आरोपींना पकडण्यात यश येईल, असेही मारिया म्हणाले


(sakal,29th april)

No comments: