Tuesday, May 5, 2009

राखीव पोलिस जाणार राजस्थान, पंजाबच्या बंदोबस्तावर

केंद्राचा निर्णय ः दोन हजार पोलिसांचा समावेश; वाढता ताण

राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर राज्य राखीव पोलिस दलातील तब्बल दोन हजार पोलिस राजस्थान व पंजाब येथे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पाठविण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे गेले काही महिने घर-दार सोडून सातत्याने बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव पोलिस दलातील जवानांना पुरेशी विश्रांती न घेताच बंदोबस्तानिमित्त परराज्यांत जावे लागणार आहे.
राज्यात 30 एप्रिल रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर राज्य पोलिस दलावरील निवडणूक बंदोबस्ताचा भार काहीसा हलका होणार आहे. मात्र, पोलिसांच्या बरोबरीनेच राज्यभर कायदा व सुव्यवस्था हाताळण्याच्या कामानिमित्त बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव पोलिसांवरील निवडणुकीचा ताण कमी होण्यासाठी पाचव्या टप्प्याची वाट पाहावी लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य राखीव पोलिस दलाच्या 15 गटांना राज्यभर संचलन करावे लागत आहे. अशातच केंद्र सरकारकडून आलेल्या पंजाब व राजस्थान येथील निवडणुकीच्या बंदोबस्ताच्या कामामुळे या पोलिसांना बंदोबस्ताच्या नावाखाली चांगलेच राबावे लागणार आहे. येत्या 3 मे रोजी राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या मुंबईहून राजस्थानसाठी निघणार आहेत. या पोलिसांना राजस्थानला नेण्यासाठी रेल्वे प्रशासन एक विशेष गाडी सोडणार आहे. नागपूर येथील 10; तर पुणे येथील पाच कंपन्यांवर या निवडणूक बंदोबस्ताची अतिरिक्त जबाबदारी आहे. पोलिस उपमहानिरीक्षक एस. एम. सय्यद, पोलिस उपायुक्त ब्रिजेश सिंग व कैसर खालिद हे या कंपन्यांचे नेतृत्व करणार आहेत. चौथ्या टप्प्यात राजस्थान येथे 7 मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा बंदोबस्त संपल्याबरोबर या ठिकाणी तैनात करण्यात आलेले पोलिस पंजाबला 13 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या बंदोबस्ताकरिता जाणार आहेत. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर या पोलिसांचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती गृह खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
केंद्राकडून मनुष्यबळाची मिळालेली अपूर्ण कुमक आणि पोलिस दलातील उपलब्ध मनुष्यबळ यांचा विचार करता, राज्य राखीव पोलिस दलाला गेल्या काही महिन्यांत दिवस-रात्र काम करावे लागत आहे. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पोलिसांच्या सोबतीलाच या दलावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी टाकत त्यांच्या साप्ताहिक रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच निवडणुकीसाठी महिनोन्‌ महिने सलग कराव्या लागणाऱ्या बंदोबस्ताच्या कामामुळे पोलिसांत नाराजीचे वातावरण आहे.



(sakal,23rd april)

No comments: