Wednesday, May 27, 2009

आता समाजकार्य करायचे आहे..!

अश्‍विन नाईक ः ठाकरे भेटीमागे कोणतेही राजकारण नाही

मी अंडरवर्ल्ड डॉन नाही. माझ्या आयुष्यातील तो अतिशय वाईट काळ होता. आता मला समाजकार्य करायचे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. सध्यातरी राजकारणात प्रवेश करण्याचा आपला कोणताही इरादा नाही. राजकारणाबाहेर राहूनही सामाजिक काम करता येते, असे वक्तव्य पूर्वाश्रमीचा अंडरवर्ल्ड डॉन अश्‍विन नाईक याने पत्रकारांशी बोलताना केले.
न्यायालयातून आजवर दाखल झालेल्या गुन्ह्यातून मुक्तता झाल्यानंतर मुंबईत स्वगृही परतलेला पूर्वाश्रमीचा गॅंगस्टर अश्‍विन नाईक याने आज घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना त्याच्या पुढील वाटचालीची माहिती दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले आयडॉल आहेत. त्यांना भेटण्याची इच्छा अनेक वर्षे मनात होती. त्यामुळे आपण त्यांची भेट घेतली. या भेटीमागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही, असेही नाईक या वेळी म्हणाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेली भेट हा निव्वळ एक योगायोग होता. ते राहत असलेल्या इमारतीसमोरच आपले गुरू राहतात. त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. तेथून बाहेर पडताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असलेल्या काही जुन्या मित्रांनी आपल्याला राज ठाकरे यांची भेट घडवून दिली. राज यांनी उचललेला मराठीचा मुद्दा योग्य आहे. यापूर्वी हा मुद्दा शिवसेना उचलत होती. मराठी माणसांचा आपल्याला अभिमान आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर बोलताना त्यांचा कौटुंबिक वाद आहे. दोघे एकत्र आले तर चांगले होईल, असेही मत त्याने मांडले. तुरुंगवासाच्या कालावधीत आपण आपले वडील, पत्नी आणि अतिशय जवळच्या लोकांना गमावले आहेत. यापुढे आपण आपल्या दोन मुलांसोबत राहणार आहोत. आपले कोणाशीही वैर नाही. ज्यांना असे वाटत असेल त्यांचे देव भले करो. यापुढे आपला जुना बांधकाम व्यवसाय सांभाळणार आहोत, असेही अश्‍विन नाईक म्हणाला. आपल्याला येत्या काळात सामाजिक कार्यात भाग घ्यायचा आहे. विशेषत्वाने खेळाकडे आपण जास्त भर देणार आहोत. हॉकी आणि बॉक्‍सिंग या खेळात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही नाईक याने या वेळी सांगितले.

No comments: