Tuesday, May 5, 2009

अंबानी हेलिकॉप्टर - एअरवर्क्‍स कर्मचाऱ्याची आत्महत्या

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत मुरूम आणि दगड टाकून त्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चौकशी झालेल्या एअरवर्क्‍स इंडिया इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्याने आज सकाळी विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ उपनगरी गाडीखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या कर्मचाऱ्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सोपविला असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याची माहिती रेल्वेचे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी दिली.
भारत दगडू बोरगे (43, रा. नालासोपारा) असे या आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत 23 एप्रिल रोजी मुरूम आणि लहान दगड आढळले होते. या हेलिकॉप्टरची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या एअरवर्क्‍स इंडिया इंजिनिअरिंग कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या बोरगे यांनी इंधनटाकीत हे दगड आणि मुरूम पाहिले होते. अंबानी यांच्या अनिल धीरूभाई अंबानी उद्योगसमूहाने हा प्रकार अतिशय गंभीरपणे घेतला होता. या घटनेमागे अंबानी यांच्या हत्येचा कट असल्याची शक्‍यता वर्तवत हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांकडून बोरगे यांच्यासह सहा जणांची चौकशी झाली होती. या घटनेनंतर बोरगे गेले काही दिवस तणावाखाली होते. आज सकाळी विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी स्वतःला उपनगरी गाडीखाली झोकून आत्महत्या केली. मूळचे सातारा जिल्ह्यातील बोरगेवाडी येथून मुंबईत स्थायिक झालेल्या बोरगेंना स्थानकावर असलेल्या अन्य प्रवाशांनी थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना न जुमानता त्यांनी उपनगरी गाडीखाली स्वतःला झोकून दिले, असे रेल्वे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी सांगितले. पोलिसांनी बोरगेंचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविला असून त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यात येत आहे. या घटनेचा अनिल अंबानी हेलिकॉप्टर प्रकरणाशी असलेला संबंध पडताळून पाहिला जात असल्याचेही शर्मा म्हणाले.

(sakal,28th april)

No comments: