Wednesday, May 27, 2009

इंडियन एअरलाईन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये थरार

सशस्त्र दरोडा ः जिगरबाज सुरक्षा रक्षकाचा अंत; दरोडेखोर पसार

मुंबई विमानतळाला लागूनच असलेल्या इंडियन एअरलाईन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये शिरलेल्या चौघा सशस्त्र दरोडेखोरांनी टर्मिनलमधील सुमारे 35 लाख रुपये किमतीची सोने आणि चांदीची नाणी असलेल्या चार पेट्या आज सकाळी पळवून नेल्या. या दरोडेखोरांना अडविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीखाली येऊन जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कार्गो टर्मिनलवर दिवसाढवळ्या पडलेल्या या दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली असून या अतिसंवेदनशील परिसरातून दरोडेखोर सहज पळून गेल्यामुळे या संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

सांताक्रूझ येथील आंतरदेशीय विमानतळाला लागूनच असलेल्या इंडियन एअरलाइन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सोने आणि चांदीच्या नाण्यांच्या सहा पेट्या हैदराबाद येथील पिडीलाइट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीला पाठविण्यासाठी आणण्यात आल्या. या संपूर्ण मालमत्तेची एकूण किंमत 54 लाख 93 हजार एवढी आहे. जोगेश्‍वरी येथील नॅशनल रिफायनरीज कंपनीमार्फत पाठविण्यात आलेल्या पेट्यांची इंडियन एअरलाईन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये तपासणी सुरू होती. सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या तिघा रिव्हॉल्व्हरधारी तरुणांनी तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करायला सुरवात केली. या वेळी दरोडेखोरांनी तेथे उपस्थित असलेले नॅशनल रिफायनरीज कंपनीचे कर्मचारी दिलीप बोरकर यांच्या डाव्या डोळ्यावर रिव्हॉल्व्हरने प्रहार केला. कार्गो टर्मिनसमध्ये दरोडेखोर शिरल्याचे कळताच तेथील कर्मचाऱ्यांनी एकच आरडाओरड सुरू केली. तोपर्यंत दरोडेखोरांनी सोने आणि चांदीची नाणी असलेल्या चार पेट्या इंडिका गाडीत टाकल्या आणि ते गाडीत बसून पळून जाऊ लागले. या दरोडेखोरांना गेटवर उभ्या असलेल्या डी. एस. भोसले या सुरक्षारक्षकाने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांची गाडी त्याला जोरदार धडक देऊन निघून गेली. गाडीसोबत दहा-बारा फूट फरफटत गेलेले भोसले जबर जखमी झाले. त्यांना तातडीने गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असतानाच भोसले यांचा मृत्यू झाल्याची माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ घुगे यांनी दिली.
ज्या इंडियन एअरलाइन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये हा प्रकार घडला तेथून विमानतळ पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. या कार्गो टर्मिनलवर इंडियन एअरलाईन्सचे सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची शस्त्रे पुरविलेली नाहीत. विमानतळाचा परिसर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या अखत्यारित येतो. मात्र कार्गो टर्मिनसच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्याकडे नसल्याबद्दलची खंत एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष डी. के. शेट्टी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

इंडियन एअरलाईन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये दरोडा घालणारे दरोडेखोर शेजारीच असलेल्या जेट एअरवेजच्या कार्गो टर्मिनलमधून गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या कार्गो टर्मिनसमध्ये सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी घेतली गेलेली नाही. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ घुगे यांनी सांगितले.


(sakal, 25th may)

No comments: