Sunday, May 24, 2009

अंबानींच्या हेलिकॉप्टरमधील बिघाड पायलटला आधीच कळला असता

राकेश मारिया ः "डीजीसीए'चा अहवाल पोलिसांना उपलब्ध

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीत दगड आणि मुरूम टाकण्याच्या घटनेसंबंधी डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचा (डीजीसीए) अहवाल गुन्हे शाखेला मिळाला आहे. या अहवालानुसार हेलिकॉप्टरने उड्डाण करण्यापूर्वीच इंजिनमध्ये झालेल्या बिघाडाची माहिती पायलटला मिळाली असती, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

कालिना येथील एअरवर्क्‍स इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हॅंगरमध्ये उभ्या असलेल्या अनिल अंबानी यांच्या बेल -412 या 13 आसनी हेलिकॉप्टरची इंधनटाकी; तसेच गिअरबॉक्‍समध्ये दगड आणि मुरूम आढळले होते. त्यामुळे संभाव्य हानीसंबंधी माहिती देणारा अहवाल या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने डीजीसीएकडे मागितला होता. त्यानुसार डीजीसीएने केलेल्या पाहणीनंतर गुन्हे शाखेला नुकताच या संपूर्ण घटनेचा अहवाल दिला आहे. या अहवालानुसार हेलिकॉप्टरमध्ये घडविण्यात आलेल्या बिघाडाची माहिती टेकऑफपूर्वीच पायलटला एका इंडिकेटरद्वारे लगेचच कळत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणापूर्वीच त्यात झालेला बिघाड कळू शकला असता आणि संभाव्य हानी टाळता आली असती, असे सांगण्यात आले आहे.

अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आढळलेल्या दगड आणि मुरूमाची माहिती देणारा एअरवर्क्‍सचा तंत्रज्ञ भारत बोरगे याने विलेपार्ले येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एअरवर्क्‍सच्या तिघा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील वादातून अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.


(sakal,19 th may)

No comments: