Sunday, May 10, 2009

रिलायन्स'च्या तीनही अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट

रिलायन्स'च्या तीनही अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट

बोरगे आत्महत्या प्रकरण ः आवश्‍यकता भासल्यास पुन्हा चौकशी

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत सापडलेल्या दगड व मुरूम प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असलेले एअरवर्क्‍स कंपनीचे तंत्रज्ञ भारत बोरगे यांच्या आत्महत्येनंतर चौकशी झालेल्या अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या तीन अधिकाऱ्यांना रेल्वे पोलिसांनी क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, आवश्‍यकता भासल्यास या अधिकाऱ्यांना रेल्वे पोलिस पुन्हा चौकशीसाठी बोलावणार आहेत.
अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बेल-412 या 13 आसनी हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत 23 एप्रिल रोजी दगड व मुरूम आढळले होते. या हेलिकॉप्टरची देखभाल करणाऱ्या एअरवर्क्‍स इंजिनियरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या भारत बोरगे यांनी पहिल्यांदा हे दगड व मुरूम पाहिले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनिल धीरूभाई अंबानी उद्योगसमूहाने अंबानी यांच्या हत्येच्या कटाची शक्‍यता वर्तविली होती. या घटनेनंतर अंबानी समूहाचे सुरक्षा अधिकारी व निवृत्त पोलिस महासंचालक के. के. कश्‍यप, माजी सहायक पोलिस आयुक्त शैलेश काळे आणि हवाई सुरक्षा प्रमुख निवृत्त विंग कमांडर सावला यांनी कालिना येथे असलेल्या "एअरवर्क्‍स'च्या हॅंगरवर भारत बोरगे यांची भेट घेतली होती. 15 मिनिटांच्या या भेटीत या अधिकाऱ्यांनी बोरगे यांचे कौतुक केले; तर काळे यांनी, बोरगे यांचा मोबाईल क्रमांक घेऊन आवश्‍यकता भासल्यास फोन करू, असे सांगितले होते. यानंतर हे तीन अधिकारी तेथून निघून गेले होते. मंगळवारी सकाळी बोरगे यांनी विलेपार्ले येथे चर्चगेटला जाणाऱ्या रेल्वेखाली आत्महत्या केली. या वेळी बोरगे यांच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या पत्रात "रिलायन्स'चे तीन अधिकारी भेटल्याचा उल्लेख होता. बोरगे यांच्या आत्महत्येशी "रिलायन्स'च्या अधिकाऱ्यांचा काही संबंध आहे का, हे पडताळून पाहण्यासाठी रेल्वे पोलिसांनी या अधिकाऱ्यांचे काल जबाब नोंदवून घेतले. तिघांच्या चौकशीत त्यांनी आपण बोरगे यांना धन्यवाद देण्यासाठी गेलो होतो, असे म्हटले आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्याचा जबाब नोंदविण्यात येत आहे. बोरगे यांच्या मोबाईल फोन रेकॉर्डवरून त्यांना आत्महत्येपूर्वी आलेल्या दूरध्वनींचा तपास केला असून, अद्याप आक्षेपार्ह असे काहीच आढळून आलेले नाही. बोरगे यांच्या मृतदेहाच्या विच्छेदनाचा प्राथमिक अहवाल यापूर्वीच आला आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे रेल्वे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

(sakal,1st may)

No comments: