Sunday, May 24, 2009

चालकाचा खून करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक

मुंबई- पुणे एक्‍स्प्रेसवेवर चालकाचा खून करून कारचोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला वांद्रे पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली. चोरी केलेल्या या कारची विक्रीसाठी जोगेश्‍वरी येथे आलेल्या या चोरट्यांच्या चौकशीत कारचालकाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अर्चना त्यागी यांनी दिली.

जोगेश्‍वरी पश्‍चिमेकडील 24 कॅरेट सिनेमागृहासमोर चोरीच्या कारची विक्री करणाऱ्या टोळीतील सदस्य येणार असल्याची माहिती परिमंडळ -9 चे पोलिस उपायुक्त निकेत कौशिक यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने 18 मे रोजी दुपारी सापळा रचून इनोव्हा गाडीतून आलेल्या तिघांपैकी प्रवीण निमसे (24) याला अटक केली. या वेळी रफिक बैरी (29) आणि सोहेल खान (23) हे साथीदार पळून गेले. या वेळी कारची झडती सुरू असताना पोलिसांना कारमध्ये दोन टॉवेल, दोरखंड, चप्पल आणि दोन शर्ट सापडले. याच वेळी चालकाच्या सीटजवळ रक्‍ताचे डागही आढळले. प्रवीण आणि त्याच्या साथीदारांनी गंभीर गुन्हा केला असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली. तेव्हा कारचोरीसाठी साथीदारांच्या मदतीने एका कारचालकाचा खून केल्याची कबुली त्याने दिली. इनोव्हा कार भाडेतत्त्वावर घेऊन मुंबई- पुणे एक्‍स्प्रेसवेवर तळेगाव फाट्यानजीक कारचालक बाळासाहेब कामठे (25, रा. कात्रज) याचा खून केला. खुनानंतर आरोपींनी कामठे याचा मृतदेह भोसरी येथे एका कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला होता.
निमसे याच्या चौकशीत उघडकीस आलेल्या या धक्कादायक माहितीनंतर पोलिस त्याच्या साथीदारांचा शोध घेऊ लागले. प्रवीणकडून मिळालेल्या माहितीवरून फरारी असलेले त्याची साथीदार मिरा रोड येथे राहत असल्याचे कळले. त्यातील दोन आरोपी भरत बोटे (26) आणि उबेद खान (29) हे दोघे जोगेश्‍वरी येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या दोघांना पोलिसांनी 20 मे रोजी सापळा रचून अटक केली. या प्रकरणातील उर्वरित आरोपी सोहेल, जावेद आणि रफिक या तिघांना काल मिरा रोड येथील नयानगर परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अटक करण्यात आली.


(sakal, 22 nd may)

No comments: