Sunday, May 10, 2009

धमकीनंतर महाजन कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा

राकेश मारिया ः राहुल महाजन यांच्याकडून तक्रार दाखल


"बिग बॉस' या रिऍलिटी शोमध्ये मिळालेले पैसे परत करावेत; तसेच दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या प्रवीण महाजन यांच्या आगामी पुस्तकाबाबत कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाऊ नये; अन्यथा तुमच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका आहे, अशा धमकीची दोन पत्रे मिळाल्यानंतर राहुल महाजन यांनी आज सायंकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. या तक्रारीनंतर महाजन कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला असून, आवश्‍यकतेप्रमाणे संरक्षणातही वाढ करण्यात आल्याची माहिती सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या वरळीच्या "पूर्णा' इमारतीत असलेल्या निवासस्थानी ही दोन्ही पत्रे 24 एप्रिल आणि 4 मे रोजी आली. यातील राहुल महाजनच्या नावे आलेल्या पहिल्या पत्रात त्याचा सहभाग असलेल्या "बिग बॉस' या रिऍलिटी शोमधून मिळालेली रक्कम त्याने परत करावी; तसेच या शोची अंतिम फेरी कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा न करता पुन्हा घेण्यात यावी, असे म्हटले आहे. "बिग बॉस' हा रिऍलिटी शो संपल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राहुल एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून काम करीत आहे. अशातच 4 मे रोजी राहुलची आई रेखा महाजन यांच्या नावे दुसरे पत्र आले. या पत्रात राहुलला पाठविलेल्या पत्रातील धमकीचा उल्लेख आहे; याशिवाय त्यांचे पती प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला त्यांचा भाऊ प्रवीण महाजन याच्या आगामी पुस्तकावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेऊ नये, असे बजावण्यात आले आहे. या पुस्तकावर कोणत्याही प्रकारची हरकत घेतल्यास संपूर्ण महाजन कुटुंबीय, त्यांची मुलगी तसेच भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्या पूनम, त्यांची मुले आणि कुटुंबीयांच्या जीविताची खैर नाही, असे धमकविण्यात आले आहे. कुटुंबीयांच्या जीविताला असलेल्या धोक्‍यामुळे काल सायंकाळी राहुल महाजन यांनी गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली होती. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महाजन यांनी या धमकीच्या पत्रांबाबत लेखी तक्रार गुन्हे शाखेकडे दाखल केली आहे.

महाजन यांना आलेली ही दोन्ही पत्रे एकाच व्यक्तीने लिहिलेली आहेत. पोस्टाने आलेल्या या पत्रातील मजकूर इंग्रजीत लिहिलेला आहे. या दोन्ही पत्रांची गंभीर दखल घेत पोलिसांनी रेखा महाजन, राहुल महाजन, पूनम महाजन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. या दोन्ही कुटुंबीयांच्या सुरक्षा व्यवस्थेत आवश्‍यकतेनुसार वाढ करण्यात आल्याची माहिती राकेश मारिया यांनी दिली.


(sakal,6th may)

No comments: