Sunday, May 10, 2009

पोलिसांनी टाकला सुटकेचा निश्‍वास

मतदान शांततेत : मतमोजणीसाठी पुन्हा सतर्कता



मुंबई ः ऐन निवडणुकीत मुंबईत दहशतवाद्यांकडून घातपाती कृत्ये होण्याची शक्‍यता पोलिसांबरोबरच गुप्तचर विभागाला वाटत होती. पाक सीमेवरून काही अतिरेकी भारतात घुसले असून ते निवडणुकीदरम्यान घातपात घडविण्याचा धोका वाटत होता. मुंबई ही नेहमीच अतिरेक्‍यांची टार्गेट राहिली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे मुंबईबरोबरच नवी मुंबईतील मतदान शांततेत पार पडले, याचे श्रेय पोलिसांनी महिनाभर घेतलेल्या परिश्रमांना जाते.

दहशतवाद्यांकडून घातपाताच्या कृत्याबरोबरच, संवेदनशील मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार होऊ नये याकरिता पोलिसांनी पुरेशी दक्षता घेतली होती. मतदारांना पैसे आणि "गिफ्ट्‌स'चे आमिष दाखवून त्यांची मते आपल्याकडे वळविण्याचा उमेदवारांचा अनेकदा प्रयत्न असतो. या सर्व घडामोडींवर गेल्या महिनाभरापासून डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणाऱ्या पोलिसांमुळेच मुंबईतील सहा मतदारसंघात आणि नवी मुंबईतील किरकोळ प्रकार वगळता या दोन्ही शहरांत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता मतदान शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता सुटकेचा निश्‍वास टाकला आहे.

तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत आणि नवी मुंबईतीलही मतदान काल झाले. मतदानाची ही प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई व नवी मुंबई पोलिसांनी घेतलेली दक्षता या निवडणुकीतील प्रमुख वैशिष्ट्य ठरले. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर नेहमीच असलेल्या मुंबईत निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचे घातपाती कृत्य घडू नये याकरिता संपूर्ण पोलिस दल सज्ज होते. 26 नोव्हेंबरला झालेला अतिरेकी हल्ला आणि गुप्तचर विभागाकडून निवडणूक काळात वर्तविण्यात आलेली देशभरातील प्रमुख नेत्यांच्या हत्येच्या कटाची शक्‍यता यामुळे संभाव्य परिस्थितीला तोंड देण्याची पूर्णतयारी पोलिसांनी केली होती. 23 हजार पोलिस, तीन हजार गृहरक्षक दल यांच्यासह केंद्रीय अर्ध सैनिक बल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस बळ, राज्य राखीव पोलिस बळ यांच्या तीसहून अधिक कंपन्यांच्या तैनातीमुळे मुंबईला या काळात लष्करी छावणीचे स्वरूप आले होते.

संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदारसंघ पूर्णतः केंद्राकडून पाठविण्यात आलेल्या सशस्त्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची दहशत खपवून घेतली जात नव्हती. मतदान केंद्रांवर शस्त्रधारी पोलिसांचा वचक असल्याने सामान्य नागरिकही अतिशय निर्भयपणे मतदान करताना दिसत होते.

निवडणुकीच्या तीन आठवड्यांपूर्वीपासून पोलिसांच्या रजा बंद करण्यात आल्या होत्या. शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोलिसांची गस्त होती. मुंबईला आणि पर्यायाने मुंबईकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शिरावर असलेले हजारो पोलिस रात्रपाळी संपल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सकाळीही कामावर होते. दहशतवादाचा समर्थ मुकाबला करतील, अशा विशेष प्रशिक्षित कमांडोंचे पथक प्रत्येक पोलिस ठाण्यात स्थापन करण्यात आले होते. शहरात ठेवण्यात आलेल्या चोख सुरक्षाव्यवस्थेमुळे किरकोळ प्रकार वगळता कोणतीही हिंसक घटना घडली नाही. याचे सर्व श्रेय पोलिसांना द्यावे लागेल. निवडणुकीनंतर आता पंधरवडाभर पोलिसांना स्वस्थ बसता येणार आहे. 16 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकरीता त्यांना पुन्हा नव्याने सज्ज व्हावे लागणार असले तरी, सध्या जनतेचा कौल आपल्या पोटात सामावलेल्या मतदान यंत्रणांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारीही याच पोलिसांवर आहे.

......
"आचारसंहितेचे उल्लंघन, पैशांचे वाटप, एकमेकांवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या किरकोळ घटनांव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था राखत शांततापूर्ण मतदानाबाबत आपण मुंबईकरांसोबतच पोलिस दलातील आपल्या सर्व वरिष्ठ व कनिष्ठ सहकाऱ्यांचे आभारी आहोत. दहशतवादाचा असलेला धोका लक्षात घेता पोलिसांनी बजावलेल्या चोख कामगिरीमुळे कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडली नाही. याबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांचे करू तेवढे कौतुक कमीच आहे.'
- के. एल. प्रसाद ( सहपोलिस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था)

No comments: