Sunday, May 24, 2009

मानवी तस्करी रोखण्यासाठी प्रथमच पथकाची स्थापना

घटनांमध्ये वाढ ः देशातील पहिले पथक

मानवी तस्करीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्याकरिता पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानवी तस्करीविरोधी पथकाची स्थापना केली आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी विशेषत्वाने स्थापन झालेले हे देशातील पहिले पथक असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत मुंबईत अशा प्रकारच्या घटनांत लक्षणीय वाढ झाल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वेगवेगळ्या कारणांमुळे पासपोर्ट नाकारलेल्या व्यक्तींना खोट्या नावांनी परदेशांत लाखो रुपये घेऊन पाठविण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. कायदेशीर बाबींची पूर्तता होत नसल्याने कामानिमित्त परदेशात जाणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष वेधले. गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मानवी तस्करी करणाऱ्यांवर केलेल्या सहा कारवायांत तब्बल चाळीस आरोपींना अटक करण्यात आली. यात समाजातील प्रथितयश व्यक्ती, पासपोर्ट विभागातील कर्मचारी, एअरलाईन्स कर्मचारी आणि काही दलालांचा समावेश आहे. मार्च महिन्यांत पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत एअर इंडियाच्या दोघा कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक करण्यात आली. या दोघा कर्मचाऱ्यांनी दोन महिलांना त्यांच्या पत्नीच्या पासपोर्टवर अमेरिकेला नेले होते. भविष्यात अशा प्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी हे पथक स्थापन करण्याकरिता पुढाकार घेतला. समाजसेवा शाखेच्या अखत्यारीत सुरू झालेले हे पथक स्वतंत्ररीत्या काम करणार असल्याची माहितीही गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

(sakal,13th may)

No comments: