Sunday, May 10, 2009

दोन तरुणांना अटक करून 44 लाख रुपये जप्त

हवाला रॅकेट ः लातूरच्या व्यापाऱ्यावर संशय

हवाला रॅकेटद्वारे मुंबईत 44 लाख रुपये घेऊन आलेल्या दोन तरुणांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी मुसाफिरखाना येथे लावलेल्या नाकाबंदीत अटक करण्यात आली. या रकमेपैकी 12 लाख रुपये एका तरुणाने अंगावर चढविलेल्या जॅकेटमध्येच होते. ही बेहिशेबी मालमत्ता लातूरच्या एका बड्या व्यापाऱ्याची असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
सुजित विलास शिंदे (21) व गणेश विठ्ठल शिंदे (25) अशी या दोन तरुणांची नावे आहेत. काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बाबूराव शेट्ये चौक येथे सुरू असलेल्या नाकाबंदीच्या वेळी पोलिस वाहनांची तपासणी करीत होते. या वेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक जालिंदर माने यांनी मोहम्मद अली रोडवरून आलेल्या एका टॅक्‍सीला हेरले. पोलिसांची तपासणी सुरू असल्याचे पाहून काही क्षणांतच ही टॅक्‍सी एका ठिकाणी थबकली. सहायक पोलिस उपनिरीक्षक माने यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी या टॅक्‍सीवर लक्ष ठेवून टॅक्‍सी जवळ येताच थांबविली. टॅक्‍सीत बसलेल्या सुजित शिंदे व गणेश शिंदे या दोन तरुणांना टॅक्‍सीतून उतरण्यास सांगितले; मात्र दोघांनी टॅक्‍सीतून उतरण्यास नकार दिला. या वेळी पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या बॅगेबाबत विचारणा केली; मात्र त्याबाबतही काहीच उत्तरे मिळत नसल्याचे पाहून पोलिसांनी सुजितची कॉलर धरून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांच्या हाताला 500 रुपयांच्या नोटांचे बंडल लागले. पोलिसांनी लगेचच त्याची अंगझडती घेतली, तेव्हा अंगावर चढविलेल्या जॅकेटमध्ये तब्बल 12 लाख रुपये त्याने लपविल्याचे उघडकीस आले. यानंतर बॅगेची तपासणी केली असता, बॅगेतही एक हजार, 500 व 100 रुपयांच्या नोटांच्या बंडलांनी ही बॅग खचाखच भरल्याचे आढळले. पोलिसांनी दोघांना तेथेच अटक केली. सुजित याच्या चौकशीत तो लातूरच्या फलटण येथील; तर गणेश साताऱ्याच्या कोरेगाव येथील राहणारा असल्याचे उघडकीस आले. या दोघांनी हवालामार्गे तब्बल 44 लाख रुपये मुंबईत आणल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बेहिशेबी मालमत्ता या दोन तरुणांकडे कोणी दिली याचा शोध पोलिस घेत आहेत; मात्र प्राथमिक तपासात ही रक्कम लातूर येथील एका बड्या व्यापाऱ्याची असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोन आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती परिमंड
ळ-1 चे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी दिली.


(sakal,8th may)

No comments: