Sunday, May 24, 2009

टीव्ही बंद न केल्याने पित्याकडून मुलाचा खून

"आयपीएल'चा बळी ः जोगेश्‍वरीतील घटनेमुळे खळबळ

टीव्हीवर इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील क्रिकेट सामना पाहण्यावरून उद्‌भवलेल्या किरकोळ वादातून एका पित्याने आपल्या चोवीस वर्षीय मुलाचा भोसकून खून केला. जोगेश्‍वरी येथे काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पित्याला अटक केली आहे.

जोगेश्‍वरी पूर्वेकडील शंकरवाडी येथील गोम्स चाळीत संदेश मेघनाथ कांबळे हा तरुण टीव्हीवर इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील क्रिकेट सामना पाहण्यात दंग होता. एका खासगी एजन्सीत सुरक्षारक्षकाचे काम करणारे त्याचे वडील मेघनाथ कांबळे (वय 60) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरी परतले. टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहणाऱ्या संदेशला त्यांनी टीव्ही बंद करण्यास सांगितले. सामना ऐन रंगात आल्याने वडिलांच्या बोलण्याकडे त्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे मेघनाथ कांबळे यांनी त्याच्यावर ओरडायला सुरुवात केली. आपल्याला सकाळी कामावर लवकर जायचे असल्याने थोडा आराम मिळावा यासाठी त्यांनी संदेशला पुन्हा एकवार टीव्ही बंद करण्यास सांगितले. मात्र, संदेश आपल्याला जुमानत नसल्याचे पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी स्वयंपाकघरातील सुरी घेऊन संदेशच्या छातीत डाव्या बाजूला वार केला. संदेश तेथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या प्रकारामुळे संदेशची आई आणि लहान भाऊ यांनी आरडाओरड केली. शेजारी आणि संदेशचा लहान भाऊ यांनी त्याला तातडीने नजीकच्या होली क्रॉस रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच संदेशचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर रात्री उशिरा संदेशच्या आईने मेघवाडी पोलिस ठाण्यात तिच्या पतीविरुद्ध मुलाच्या खुनाची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी मेघनाथ कांबळे यास अटक केली. संदेशचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मेघवाडी पोलिसांनी दिली.

(sakal,11th may)

No comments: