Tuesday, May 5, 2009

सराफांना फसविणाऱ्या भामट्यांचा छडा

कोट्यवधीची लुबाडणूक ः प्रभाव पाडून हातोहात भामटेगिरी

अंगावर महागडा सूट, गळ्यात टाय, हातात महागडा मोबाईल फोन असा चकाचक पेहराव करून नवाबी थाटातील एक मध्यमवयीन व्यक्ती 11 एप्रिल रोजी वांद्य्राच्या "सिरस ज्वेलरी' या सराफाच्या दुकानात जाते. त्याच्या अस्खलित इंग्रजी बोलण्यावर दुकानमालक आणि त्याचे कर्मचारीही भाळतात. "आपल्या काही क्‍लायंट्‌सना सोन्याचे; तसेच हिऱ्याचे हार खरेदी करून द्यायचे आहेत. तुमचा कर्मचारी हॉटेल रॉयल चायना या तारांकित हॉटेलमध्ये दागिन्यांसोबत पाठवा' , असे सांगून ती निघून जाते. एका दिवसात लाखोंचा व्यापार होणार या आशेने दुकानमालक त्याच्याकडे काम करणाऱ्या एका चुणचुणीत तरुणीला दुसऱ्या दिवशी दुपारी दागिन्यांची डिलिव्हरी द्यायला हॉटेल रॉयल चायना येथे पाठवितो. हॉटेलमध्ये आलेल्या या तरुणीकडून ऐंशी लाख रुपयांचे दागिने घेऊन ती गर्भश्रीमंत व्यक्ती दागिने क्‍लायंट्‌सना दाखविण्याच्या बहाण्याने तिच्यापासून दूर जाते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही दागिने घेऊन गेलेली ती व्यक्ती परत न आल्याने फसगत झाल्याचे या तरुणीच्या लक्षात येते. मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो...!

मुंबई, बंगळूरु, हैदराबाद येथील सराफांना अशीच मोडस ऑपरेंडी वापरून आतापर्यंत एक कोटी 70 लाख रुपयांना हातोहात चुना लावणारा हा भामटा आणि त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. क्रिकेट बेटिंगमध्ये झालेले लाखो रुपयांचे नुकसान भरून काढण्यासाठी "बंटी और बबली' या चित्रपटातून प्रेरणा घेऊन व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा हा अनोखा उद्योग सुरू केल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली आहे. नरेन मदनलाल शर्मा (45) आणि मुकेश रामय्या (28) अशी या दोघा भामट्यांची नावे आहेत. दादर रेल्वेस्थानकातून काल रात्री गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या दोघांना अटक केली. पुण्यात कोंढवा येथील एनआयपीएम कॉलनीत राहणाऱ्या या दोघा भामट्यांनी अवघ्या महिनाभरात मोठमोठ्या सराफांना गंडा घातल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसही अवाक्‌ झाले आहेत. दहा महिन्यांपूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये एकमेकांना भेटलेल्या या दोघांनी 17 मार्चला हैदराबाद येथे सराफाला 54 लाख रुपयांचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने हॉटेल ताज डेक्कनमध्ये बोलावून फसविले; तर 18 मार्चला बंगळूरुमधील एका सराफाकडून हॉटेल लीला पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये 16 लाखांचे हिऱ्यांचे दागिने लुबाडले होते. 11 एप्रिलला मुंबईत केलेल्या भामटेगिरीनंतर लगेचच 13 एप्रिलला त्यांनी बंगळूरु येथील रेगिनो ड्राईव्ह या घड्याळाच्या महागड्या दुकानात जाऊन 20 लाख रुपयांची घड्याळे लंपास केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. दुकानांत लावलेल्या सीसीटीव्हीत आपली छबी येऊ नये यासाठी नरेन शर्मा नेहमी मोबाईल फोनवर बोलत आपला चेहरा हाताने झाकून घेत असे. यापूर्वी तो बहारीन आणि सिंगापूर येथे संगणकाच्या सुट्या भागांच्या खरेदी
-विक्रीचा व्यापार करीत होता, अशीही माहिती मारिया यांनी दिली.

(चौकट)
शेरास भेटले सव्वाशेर
मोठमोठ्या सराफांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या नरेन आणि मुकेश या दोघांना 42 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे 12 लाख रुपयांत देतो, असे सांगून दिल्लीतील एका तरुणाने फसविले होते. सोन्याची म्हणून खरेदी केलेली ही बिस्किटे प्रत्यक्षात तांब्याची होती, अशी माहितीही पोलिसांनी या वेळी दिली.


(sakal,23rd april)

No comments: