Sunday, May 24, 2009

अपना सहकारी बॅंकेवर दरोडा

नायगावमधील घटना ः शस्त्राच्या धाकाने 29 लाख पळविले

भोईवाडा पोलिस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नायगावच्या अपना सहकारी बॅंकेच्या स्ट्रॉंग रूमधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या कॅशियर आणि सुरक्षा रक्षकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील सुमारे 29 लाख रुपयांची रोकड जबरीने चोरून नेल्याची घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सदाकांत ढवण उद्यानासमोर असलेल्या या बॅंकेत सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पहिल्या मजल्यावर असलेल्या या बॅंकेचा स्ट्रॉंग रूम इमारतीच्या तळमजल्यावर आहे. कॅशियर अरुण लावंड बॅंकेचे नियमित आर्थिक व्यवहार सुरू करण्याकरिता लागणारी रक्कम काढण्यासाठी सुरक्षा रक्षक अनिल कांबळे यांच्यासोबत स्ट्रॉंग रूममध्ये गेले. लावंड स्ट्रॉंग रूमधून पैसे काढत असताना सुरक्षा रक्षक कांबळे बाहेर थांबला होता. पैशाने भरलेली बॅग घेऊन लावंड बाहेर पडताच समोरून आलेल्या दोघा अनोळखी चोरट्यांनी लावंड आणि कांबळे या दोघांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्या हातातील रोख रकमेची बॅग हिसकावून घेतली. पुढच्याच क्षणात दोघेही चोरटे एका मारुती कारमधून पळून जाऊ लागले. त्यानंतर कॅशियर लावंड व सुरक्षा रक्षक कांबळे या दोघांनीही आरडाओरडा केला; मात्र त्यापूर्वीच गोविंद केणी मार्गाच्या दिशेने मारुती कारमधून हे चोरटे पळून गेले. घडलेल्या प्रकाराची माहिती बॅंक व्यवस्थापनाने लगेचच भोईवाडा पोलिसांना दिली. चोरट्यांनी पळविलेल्या बॅगेत 28 लाख 75 हजार 344 रुपयांची रोकड होती. पोलिसांनीही या परिसरात काही क्षणातच नाकाबंदी केली.
या प्रकरणी अनोळखी चोरट्यांविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळची वेळ असल्याने बॅंकेची सुरक्षा व्यवस्थाही तेवढी सक्षम नव्हती. याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचे भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंबादास गदादे यांनी सांगितले. कॅशियर लावंड स्ट्रॉंग रूममधून रोख काढण्यासाठी गेले असताना बाहेर उभा असलेला सुरक्षा रक्षक निःशस्त्र होता, असेही गदादे म्हणाले. या घटनेनंतर भोईवाडा परिसरात एकच घबराट पसरली होती. या चोरीनंतरही आज दिवसभर बॅंकेचे व्यवहार सुरळीत होते, अशी माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.


(sakal,22nd may)

No comments: