Tuesday, May 5, 2009

बोरगे मृत्युप्रकरणी रिलायन्सच्या तीन अधिकाऱ्यांचे जबाब

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टर प्रकरणातील प्रमुख साक्षीदार एअरवर्क्‍स कंपनीचा कर्मचारी भारत बोरगे याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्याला भेटलेल्या रिलायन्सच्या तिघा अधिकाऱ्यांचे जबाब आज रेल्वे पोलिसांनी नोंदविले. या अधिकाऱ्यांत माजी पोलिस महासंचालक के. के. कश्‍यप यांच्यासह निवृत्त सहायक पोलिस आयुक्त आणि निवृत्त विंग कमांडर यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरची देखभाल करणारा एअरवर्क्‍स इंजिनिअरिंग इंडिया कंपनीचा तंत्रज्ञ भारत बोरगे याला 23 एप्रिल रोजी हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत दगड आणि मुरूम आढळले होते. या प्रकरणानंतर अंबानींच्या हत्येच्या कथित कटाची शक्‍यता वर्तवत हे प्रकरण चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते. या घटनेनंतर सध्या रिलायन्स कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले माजी पोलिस महासंचालक के. के. कश्‍यप, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त शैलेश काळे आणि हवाई उड्डाण सुरक्षा विभागाचे अधिकारी निवृत्त विंग कमांडर सावला यांनी हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या भारत बोरगे याच्याकडे कालिना येथे जाऊन चौकशी केली होती. रिलायन्सच्या या अधिकाऱ्यांचा उल्लेख बोरगे याने त्याच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. आज या तिन्ही अधिकाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचेही रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.


(sakal,30th april)

No comments: