Tuesday, May 5, 2009

आरोपी नगरसेवकास सहआरोपीची मारहाण

भुलेश्‍वर येथील घरमालकाकडे 13 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने "मोक्का'खाली अटक केलेला शिवसेना नगरसेवक विजय वाशिर्डे याला आज वैद्यकीय चाचणीसाठी जेजे रुग्णालयात नेत असताना सहआरोपीने मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी जेजे मार्ग पोलिस ठाण्यात या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुलेश्‍वर येथील एका घरमालकाकडून 13 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पांडूपुत्र टोळीच्या नऊ जणांना गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात अटक केली. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या नऊ आरोपींना नियमित वैद्यकीय तपासणीकरिता जेजे रुग्णालयात पोलिसांच्या गाडीतून नेले जात होते. या वेळी त्यांच्यासोबत तब्बल 27 पोलिस होते. न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी नगरसेवक विजय वाशिर्डे याने आपल्यासाठी वकील केला नाही याचा राग मनात धरून सहआरोपी लक्ष्मण किरण (27) याने वाशिर्डे याला गाडीतच मारहाण करायला सुरुवात केली. या हाणामारीत वाशिर्डे गाडीच्या जाळीवर धडकल्यामुळे जखमी झाला. या प्रकरणी सायंकाळी जेजे मार्ग पोलिस ठाण्यात लक्ष्मण किरण याच्याविरुद्ध हाणामारीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम देसाई यांनी दिली.



(sakal,24th april)

No comments: