Sunday, May 24, 2009

टाटा हॉस्पिटलचे अधिकारी खातायत मृतांच्या टाळूवरचे लोणी

वितरण मृतांच्या नावाने ः महागड्या औषधांची खुल्या बाजारात विक्री

असाध्य अशा कर्करोगावर उपचाराकरिता आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या परळच्या टाटा मेमोरिअल रुग्णालयात मृत रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांच्या नावे कोट्यवधी रुपयांच्या औषधांचे वितरण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्करुग्णांसाठी कमी किमतीत उपलब्ध होणारी कोट्यवधी रुपयांच्या जीवरक्षक औषधांची खुल्या बाजारात चढ्या दराने विक्री करणारे मोठे रॅकेट केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणले आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला हा औषधांचा गैरव्यवहार शंभर कोटी रुपयांचा असल्याची शक्‍यता सीबीआयचे सहसंचालक ऋषीराज सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या प्रकरणी रुग्णालयातील सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरांवर सीबीआयने छापे घातले असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत असल्याचेही सिंग यांनी सांगितले.

कर्करोगाने जर्जर झालेल्या रुग्णांना जीवरक्षक ठरणाऱ्या औषधांचा टाटा मेमोरिअल रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार तसेच त्याची अवैध विक्री होत असल्याची तक्रार 29 एप्रिल रोजी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या वितरणावर लक्ष ठेवले. तसेच रुग्णालयातील औषध विभागातील कागदपत्रांच्या दस्तऐवजाचीही तपासणी सुरू केली असता रुग्णालयाच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या प्रोटोकॉल मेडिसिन्सच्या प्रत्यक्ष वितरणातही मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली. यानंतर सीबीआयच्या पथकाने केलेल्या सखोल तपासात कर्करुग्णांना अतिशय कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या महागड्या औषधांची रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी खुल्या बाजारात सर्रास विक्री करीत असल्याचे उघडकीस आले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक अथवा अनोळखी व्यक्तींच्या नावे खोट्या पावत्या बनवून त्यांना या औषधांचे वितरण केले जात असल्याचे भासविण्यात येत होते. याशिवाय रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता रुग्णाच्या नावे त्याला प्रत्यक्ष दिलेल्या औषधापेक्षा जास्त औषधांची नोंद केली जात असल्याचेही उघडकीस आले. खुल्या बाजारात अतिशय महाग असलेल्या या औषधांच्या विक्रीकरिता रुग्णालयातील काही अधिकारी व कर्मचारी हवा तो मार्ग पत्करून नफा कमवीत असल्याचे स्पष्ट झाले. तपासात टाटा रुग्णालयाच्या सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. रेखा बतूरा, डिस्पेन्सरी विभागाचे कार्यालयप्रमुख वाय. बी. दीक्षित, फार्मासिस्ट पी. बी. ढाके, नमिता देशपांडे, लीना नखरे आणि चेतना पवार हे सहा अधिकारी व कर्मचारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे. रुग्ण
ालयातील आणखी किमान सात अधिकारी या रॅकेटमध्ये गुंतले असल्याची शक्‍यता असून त्यांची चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोषी असलेल्या सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरांवर सीबीआयच्या पथकाने छापे घातले असून त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सिंग यांनी पत्रकारांना दिली.
टाटा रुग्णालयात कर्करुग्णांसाठी वर्षाला 80 कोटी 50 लाख रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. गेल्या चार वर्षांपासून या रुग्णालयात औषधांची काळ्या बाजारात विक्री होत होती.
दरम्यान, या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक आर. बडवे यांनी सीबीआयच्या तपासाला रुग्णालय प्रशासन पूर्णपणे योग्य ते सहकार्य करीत असून दोषी आढळलेल्या सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीच निलंबित करण्यात आल्याचे अधिकृत प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.


(sakal,15th may)

No comments: