Tuesday, May 5, 2009

बेपत्ता अधिकाऱ्याबाबत नौदलाचा निष्काळजीपणा

नातेवाईक संतप्त ः 12 एप्रिलपासून बेपत्ता

आयएनएस गोदावरी या भारतीय नौदलाच्या जहाजावर कार्यरत असलेला नौदल अधिकारी जहाजातून बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 12 एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या या अधिकाऱ्याचा नौदलाच्या अथक प्रयत्नांनंतरही अद्याप शोध लागलेला नाही. याप्रकरणी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली असून यलोगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, नौदलाच्या बेजबाबदारपणामुळे अद्याप या अधिकाऱ्याचा शोध लागलेला नसल्याचा आरोप या अधिकाऱ्याच्या नातेवाईकांनी "सकाळ'शी बोलताना केला आहे.

प्रेमप्रकाश शुक्‍ला असे या बेपत्ता नौदल अधिकाऱ्याचे नाव आहे. नौदलात पेट्टी ऑफिसर पदावर कार्यरत असलेले शुक्‍ला 12 मार्चला मुंबईहून कोचीनला आयएनएस गोदावरीतून गेले होते. तेथून 11 एप्रिलला सहकाऱ्यांसोबत ते मुंबईत परतले; मात्र 12 एप्रिलच्या पहाटे 4 वाजेपर्यंत दोघा सहकाऱ्यांसोबत असलेले शुक्‍ला अचानक बेपत्ता झाल्याचे शुक्‍ला यांचे नातेवाईक विनोद पांडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. नौदलाने जहाजातून बेपत्ता झालेल्या शुक्‍लाची गंभीर दखल घेतली नाही. या अधिकाऱ्याचा आजतागायत तपास न लागणे लज्जास्पद असल्याचेही पांडे या वेळी म्हणाले.

दरम्यान, नौदलाने आज प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धिपत्रकात 12 एप्रिलला सकाळी 8 वाजल्यापासून प्रेमप्रकाश शुक्‍ला बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. ते बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच नौदलाने आपले शोधकार्य सुरू केले. शुक्‍ला यांच्या शोधार्थ नौदलाची तीन जहाजे, एक हेलिकॉप्टर 16 एप्रिलपर्यंत कार्यरत होते. गोवा आणि कारवारच्या समुद्र तसेच किनाऱ्यांवरही शुक्‍ला यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते सापडले नाहीत. याबाबत शुक्‍ला यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आल्याचे संरक्षण विभागाने आज काढलेल्या एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

(sakal,22nd april)

No comments: