Tuesday, May 5, 2009

अंबानी हेलिकॉप्टरप्रकरणी चौघेजण ताब्यात

पोलिसांकडून गंभीर दखल ः विशेष पथकाद्वारे चौकशी होणार

अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीत दगड आणि मुरूम टाकल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एअरवर्क्‍स कंपनीच्या चौघा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या चौघांची चौकशी सुरू होती. या प्रकरणी कोणालाही अटक केली नसल्याचे विमानतळ पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा विशेष पथक नेमून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सहार आंतर्देशीय विमानतळावर बुधवारी रात्री अंबानी यांचे बेल -412 हे तेरा आसनी हेलिकॉप्टर उभे करण्यात आले होते. या हेलिकॉप्टरची नियमित चाचणी तसेच मेंटेनन्सचे काम एअरवर्क्‍स इंडिया इंजिनीअरिंग या कंपनीकडे आहे. काल या कंपनीचे दोन तंत्रज्ञ व दोन मदतनीस असे चौघे हेलिकॉप्टरची नियमित पाहणी करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना हेलिकॉप्टरची इंधन टाकी आणि गिअरबॉक्‍समध्ये मोठ्या प्रमाणावर लहान दगड आणि मुरूम पडल्याचे आढळले. हेलिकॉप्टरच्या गिअरबॉक्‍समध्ये दगड अडकल्यास उड्डाण केल्यानंतर त्यात बिघाड होऊन अपघात होण्याची तसेच इंधन टाकीत मिसळलेल्या मुरूमामुळे हेलिकॉप्टरचा हवेतच स्फोट होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अंबानी यांच्या अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप या कंपनीने हा प्रकार अतिशय गांभीर्याने घेतला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवरून नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी येथे कंपनीच्या नऊ प्रमुख उच्चाधिकाऱ्यांसह अनिल अंबानी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी जातात. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अंबानी त्यांच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नवी मुंबईला याच हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणार होते, असे समजते. त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर समजला जात आहे. याप्रकरणी हेलिकॉप्टरचे नियमित मेंटेनन्स करणाऱ्या एअरवर्क्‍स कंपनीच्या चौघा कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. हे कर्मचारी पोलिसांना चौकशीसाठी आवश्‍यक ती मदत करीत आहेत. या प्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घुगे यांनी दिली. दरम्यान, आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी हा गंभीर प्रकार असल्याचे सांगितले. या प्रकरणी गुन्हे शाखा विशेष पथकाची स्थापना करून स्वतंत्र च
ौकशी करणार असल्याचेही मारिया यावेळी म्हणाले.


(sakal,24th april)

No comments: