नक्षलवाद्यांच्या गोळीबारात सोळा पोलिस शहीद
गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात सोळा पोलिस शहीद झाल्याच्या घटनेनंतर या परिसरात वाढत्या नक्षलवादाचा बीमोड करण्याकरिता लवकरच "विशेष ऑपरेशन' सुरू केले जाणार असून उद्या (ता. 22) सकाळी या भागाच्या पाहणीसाठी आपण गडचिरोली येथे जात असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
गडचिरोलीपासून 55 किलोमीटर आत असलेल्या धानोरा तालुक्यातील मुरूम गावात नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दोन गाड्यांवर केलेल्या हल्ल्यात सोळा पोलिस शहीद झाले. नक्षलवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळताच त्या त्या परिसरात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी अधिकाधिक पोलिस घेऊन चाल करायची असते; मात्र मुरूम येथे नेमणुकीवर असलेले अधिकारी अय्यर यांनी नक्षलवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळताच कोणालाही न सांगता उपलब्ध पोलिसांना दोन वाहनांत घेऊन गेले. वाटेत कापलेल्या झाडांच्या आड लपलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या गाड्यांवर गोळीबार केला. या वेळी पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. मात्र पोलिसांच्या तुलनेत नक्षलवादी संख्येने फारच जास्त असल्याने 16 पोलिस शहीद झाले. या परिसरात निवडणूक काळात पोलिसांनी लावलेल्या चोख बंदोबस्तामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा बसला होता. या ठिकाणी झालेल्या 56 टक्के मतदानामुळे येथील नागरिकांनी नक्षलावादाला भीक घातली नसल्याचे चित्र होते. याचाच सूड उगवण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही कारवाई केली असावी. या परिसरातील नक्षलवाद नेस्तनाबूत करण्यासाठी विशेष पावले उचलण्यात येणार आहेत. उद्या सकाळी या भागाची पाहणी करून पुढचा कृती आराखडा ठरविला जाईल, असेही विर्क या वेळी म्हणाले. याच वेळी या हल्ल्यामागील कारण शोधण्याचाही प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
(sakal, 21st may)
No comments:
Post a Comment