Tuesday, May 5, 2009

हिरानंदानीला बॉम्बस्फोटाचा ई-मेल पाठविणारा ताब्यात

पवईच्या हिरानंदानी संकुलात राहणारा तरुण इमारतीत बॉम्बस्फोट घडविणार असल्याच्या खोट्या माहितीचा ई-मेल हिरानंदानी समूहाला पाठविणाऱ्या अनिवासी भारतीयाला दहशतवादविरोधी पथकाने केरळ येथे ताब्यात घेतले असून त्याला आज मुंबईत आणण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याला अटक केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अनिवासी भारतीयासोबत असलेले समलिंगी संबंध पुढे सुरू ठेवण्यास या इमारतीत राहणाऱ्या तरुणाने नकार दिल्याने त्याला धडा शिकविण्याकरिता त्याने बॉम्बफोटाच्या धमकीचा ई-मेल पाठविला होता.
आनंद (43) असे या अनिवासी भारतीयाचे नाव आहे. सौदी अरेबियात वास्तव्याला असलेल्या आनंदचे हिरानंदानी संकुलात राहणाऱ्या जेजे नावाच्या तरुणासोबत समलिंगी संबंध होते. यानंतर काही दिवसांत जेजेचे याच इमारतीत राहणाऱ्या एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या उपाध्यक्षासोबत समलिंगी संबंध सुरू झाले. जेजेने आपल्या संबंधांना धुडकावल्यामुळे आनंदने त्याला धडा शिकवायचे ठरविले. यानंतर त्याने हिरानंदानी समूहाच्या ई-मेल ऍड्रेसवर जेजे पवईच्या हिरानंदानी संकुलात बॉम्बस्फोट घडविणार असल्याच्या माहितीचा ई-मेल पाठविला. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने जेजे करवी आनंदला दूरध्वनी करून मुंबईत बोलावले. संबंध पूर्ववत होणार असल्याने आनंद मुंबईला यायला निघाला. मात्र, थेट केरळला उतरला. दहशतवादविरोधी पथकाच्या तुकडीने त्याला केरळमध्ये सापळा रचून ताब्यात घेतले. आनंदला आज मुंबईत आणण्यात आले असून चौकशीनंतर त्याला अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(sakal, 27th april)

No comments: