सबको चाय पिलाव... कोल्डड्रिंक्स लाव... चला बाबासाहेबांच्या पुतळ्याला सगळ्यांनी मिळून पुष्पहार घालूया... न्यायदेवतेचे आभार मानणारे बोर्ड लिहूया... कडेकोट पोलिस बंदोबस्तात घाटकोपरच्या माता रमाबाई आंबेडकरनगरात नागरिकांची सुरू असलेली ही लगबग या परिसरात नव्याने येणाऱ्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत होती. तब्बल एक तपाच्या प्रतीक्षेनंतर येथील प्रत्येक नागरिकाला आज न्याय मिळाला होता. बारा वर्षांपूर्वी याच रमाबाई आंबेडकरनगरात निरपराध लोकांवर केलेल्या गोळीबाराच्या खटल्याचा निकाल आज लागला. पोलिसांना या गोळीबाराचे आदेश देणारा तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक मनोहर अंबादास कदम याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याचे समजताच या नगरातील प्रत्येक घरात समाधानाचे वातावरण होते.
घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगरात 11 जुलै 1997 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर तेथील नागरिकांनी आंदोलन केले. या उद्रेकाला रोखण्याकरीता त्या वेळी बंदोबस्त नेमणुकीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक मनोहर कदम यांनी पोलिसांना आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश दिले खरे; मात्र या गोळीबारात दहा निरपराध लोकांनी प्राण गमावले, तर कित्येक जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश देणाऱ्या उपनिरीक्षक मनोहर कदम यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तेव्हापासून सुरू झाली. या गोळीबाराच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती गुंडेवार आयोगाने उपनिरीक्षक कदम यांना दोषी ठरवीत त्यांच्यावर खटला दाखल केला. या खटल्याच्या निकालाकडे रमाबाई आंबेडकरनगरचेच नाही, तर सबंध देशाचे लक्ष लागले होते. बारा वर्षे सुरू असलेल्या या प्रकरणाचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात कदम याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
या निकालानंतर रमाबाई आंबेडकरनगरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गेल्या पंधरवड्यापासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. अखेर आज या लक्षवेधी खटल्याचा निकाल लागला. या निकालानंतर रमाबाई आंबेडकरनगरात राहणाऱ्या आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. गोळीबारात मरण पावलेल्यांचे नातेवाईक, जखमी आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासह या काळात पोलिसांनी ज्या ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले त्या सगळ्यांनीच मनोहर कदम याला झालेल्या शिक्षेचे स्वागत केले. निकालानंतर या नगरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सायंकाळी प्रचंड संख्येने नागरिक जमा झाले. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून; तसेच मेणबत्त्या प्रज्वलीत करून त्यांनी अभिवादन केले.
निकालाबाबत आपण समाधानी आहोत; मात्र दहा जणांचे प्राण घेणाऱ्या मनोहर कदमरुपी "इंडियन कसाब'ला वरच्या न्यायालयातही फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पोलिसांनी आंदोलनाच्या वेळी 35 आंदोलकांवर दाखल केलेल्या खोट्या तक्रारी मागे घ्याव्यात, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते; तसेच या घटनेनंतर "रमाबाई आंबेडकरनगरातील हत्याकांड' नावाचे पुस्तक लिहिणारे डॉ. हरीश अहिरे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. सामान्य नागरिकांवर गोळीबार करणाऱ्यांना न्यायालयाने शिक्षा दिली; मात्र त्या दिवशी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा शोध अद्याप लागला नसल्याची खंत दीपक भोसले यांनी व्यक्त केली.
--------
लोकशाहीर घोगरेचे आत्मबलिदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेच्या घटनेनंतर सबंध देशभरातील दलित समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती. पोलिसांच्या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाल्याचे कळताच संतापलेला भीमसैनिक घराघरांतून बाहेर पडून आंदोलनात सामील झाला. कुर्ला पूर्वेला बर्वे रस्त्यालगत असलेल्या बुद्धकॉलनीतील संतप्त तरुणही या आंदोलनात उतरले. या वेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जितेश भालेराव या उमद्या तरुणाचाही नाहक बळी गेला. रमाबाई आंबेडकरनगरात झालेल्या गोळीबारानंतर विचलित झालेल्या विलास घोगरे या लोकशाहिराने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले होते.
(sakal,7th may)
No comments:
Post a Comment