"यू ऑल वील बी डेड, बाय...! ' असा मजकूर असलेली चिठ्ठी मस्कतहून चेन्नईला जात असलेल्या विमानाच्या प्रसाधनगृहात एका हवाईसुंदरीला सापडल्याने कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता पायलटने हे विमान तातडीने मुंबई विमानतळावर उतरविले. त्यानंतर विमानाची बॉम्बशोधक आणि विनाशक तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांच्या मदतीने संपूर्ण तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विमानात आक्षेपार्ह असे काहीच आढळले नसल्याचे सांगण्यात आले. विमानातील प्रवाशांना मात्र सायंकाळी उशिरापर्यंत मुंबई विमातळावर ताटकळत राहावे लागले.
ओमन एअरवेजचे बोईंग 737 जातीचे तसेच डब्ल्यूवाय- 857 क्रमांकाचे विमान मस्कत येथून चेन्नईकडे जात होते. मुंबईजवळ असताना या विमानाच्या प्रसाधनगृहात गेलेल्या एका हवाईसुंदरीला एक चिठ्ठी आणि एक इलेक्ट्रॉनिक सर्किट जोडलेला धातूचा तुकडा सापडला. हवाईसुंदरीने याची माहिती पायलटला कळविली. पायलटने तातडीने मुंबई विमानतळाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास हे विमान मुंबई विमानतळावर उतरले. या वेळी विमानात असलेल्या सर्वच्या सर्व 110 प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर बॉम्बशोधक आणि विनाशक तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांनी या विमानाची कसून तपासणी केली. विमानात सापडलेला धातूचा तुकडा आणि चिठ्ठीचे परीक्षण करण्यात येत असल्याची माहिती विमानतळ सूत्रांनी दिली
(sakal,25th may)
No comments:
Post a Comment